फटाके फोडण्याच्या कारणावरुन तांबापुरात एकाचा खुन..

जळगाव :मंगळवारी २५ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास शहरातील तांबापुरात एका कुटुंबावर चार अनोळखीनी व्यक्तिंनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. त्यात एका तरुण मुलाचा घाव लागल्याने खून झाला असून इतर पाच जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून त्यांचा तपास सुरू झाला आहे. दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गर्दी झाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील तांबापुरा भागात प्रदीप सिंग यांचे कुटुंब वास्तव्यास आहे.मंगळवारी २५ रोजी ते घराजवळ असताना अचानक अज्ञात लोकांनी येऊन पूर्व वैमानस्यातून त्यांच्यावर चाकू आणि इतर अज्ञात शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला केला. यात संजय सिंग प्रदीप सिंग (वय २१) याला छातीमध्ये डाव्या बाजूने चाकू खुपसला गेल्याने वार लागला. तर त्याचा सख्खा भाऊ करण सिंग (वय १७), वडील प्रदीप सिंग आयात सिंग (वय ४०), नातेवाईक बग्गा सिंग (वय २८), बलवंत सिंग (वय ६०) यांनाही मार बसला आहे.

यात करण सिंग व बग्गा सिंग यांना चाकू लागला असून प्रदीप सिंग व बलवंत सिंग यांच्या डोक्यावर मार लागला आहे. घटनास्थळी पोलिसांना माहिती मिळताच ते दाखल झाले. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी तपासणी झाल्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संजय सिंग प्रदीप सिंग याला मयत घोषित केले. तर इतर चौघांवर उपचार सुरू आहेत.

घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्यासह एमआयडीसी पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी व सुरक्षा बलाची एक गाडी दाखल झाली. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात देखील गर्दी झाल्याने तेथे पोलिसांनी उपस्थिती दिली.