अंधेरी पोटनिवडणुकीच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा अखेर आज सकाळी मुंबई महापालिकेने स्वीकारला. त्यामुळे लटके यांचा निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
ऋतुजा लटके या शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी आहेत. त्या मुंबई महानगरपालिकेच्या अंधेरी पूर्व कार्यालयात लिपीक पदावर नोकरीस होत्या.महिन्याभरापूर्वीच त्यांनी आपला राजीनामा दिला होता. पण त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला नव्हता. जोपर्यंत त्यांचा राजीनामा मंजूर होत नाही, तोपर्यंत त्यांना निवडणुकीचा अर्ज भरता येणार नव्हता. त्यामुळे ठाकरे गटापुढे पेच निर्माण झाला होता. त्यानंतर ठाकरे गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली.
त्यावर काल झालेल्या सुनावणीच्यावेळी लटके यांचा राजीनामा शुक्रवारी सकाळी 11 वाजेपर्यंत स्वीकारावा आणि तसे पत्र द्यावे, असे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार मुंबई महापालिकेने आज सकाळीच ऋतुजा लटके यांचा राजीनामा अखेर मंजूर केला.
दरम्यान, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे विरुद्ध भाजप-महायुती अशी ही लढत होणार आहे. ऋतुजा लटके विरुद्ध भाजपचे मुरजी पटेल असा हा सामना रंगणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी 3 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे