मुंबईतील गोरेगावच्या नेस्को संकुलाने आज पुन्हा एकदा शिवसेनेचा, शिवसेनेच्या ज्वलंत हिंदुत्त्वाचा, निष्ठावान शिवसैनिकांचा झंजावात अनुभवला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे प्रखर विचार ऐकण्यासाठी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून शिवसेना गटप्रमुख या मैदानावर जमल्याचं पाहायला मिळाल. सागराच्या सतत उसणाऱ्या लाटांप्रमाणे या जनसागरात शिवसेनेच्या गटप्रमुखांचे जथ्थे जथ्थे पोहोचताना दिसत होते. शिवसेना झिंदाबाद… जय भवानी जय शिवाजी… अशा घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडला होता… शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं भाषण सुरू झाल्यानंतर शिवसेनेचे गटप्रमुख त्यांचे शब्द प्राण कानाशी आणून ऐकत होते. उद्धव ठाकरे यांच्या प्रत्येक फटकाऱ्यांवर जोरदार घोषणांसह तुफान प्रतिसाद जनासागराकडून मिळताना दिसत होता.
विराट… अतिविराट अशा या सभेला संबोधित करताना शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जमलेल्या माझ्या तमाम हिंदू भगिनी आणि बांधवांनो अशी सुरुवात केली. ‘आज एवढं आहे तर दसऱ्याला किती असेल, किती पटीत असेल आणि दसरा आपला परंपरेप्रमाणे शिवतीर्थावरच होणार, शिवतीर्थावरच घेणार’, अशा दमदार शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली आणि सारा शिवसैनिकांनी त्याला प्रचंड टाळ्यांचा कडकडाट करत, जोर जोरात शिट्या वाजवत आणि शिवसेना झिंदाबाद अशा घोषणा देत प्रतिसाद दिला.
यापुढे बोलताना त्यांनी रिकाम्या खूर्चीकडे बोट दाखवत म्हटलं की, व्यासपीठावर आल्यावर मी दोन गोष्टी बघितल्या. एकतर पहिली रिकामी खूर्ची संजय राऊत यांची आहे. त्यावर खुलासा करताना त्यांनी शिंदे गटाला ‘मिंधे’ गट असा टोला हाणला. ते म्हणाले की, मिंदे सगळे तिकडे गेलेले आहेत. पण संजय राऊत मोडेन पण वाकणार नाही या निश्चयाने लढतो आहे. लढाईमध्ये सोबत आहे आणि तलवार हातात घेऊन आघाडीवर आहे, अशा शब्दात त्यांनी संजय राऊत यांची आठवण करत कौतुकोद्गार काढले.
पुढं उद्धव ठाकरे म्हणाले की, आपण ज्यांना सत्तेचे दूध पाजले आता त्यांची गटारे उघडली आहेत. मुंबई तोडण्यासाठी गिधाडे घिरट्या घलत आहेत, तुम्ही त्यांना मुंबईचे लचके तोडू द्याल का? आत्तापर्यंत मुलं पळवणारी टोळी ऐकलं होतं, पण बाप पळवणारी अवलाद महाराष्ट्र पहिल्यांदा पाहतोय. अमित शहा मुंबईत आले होते तेव्हा म्हणाले की, शिवसेनेला आता जमीन दाखवायची आहे. त्यांना एवढाच सांगतो की तुम्ही आम्हाला जमीन दाखवणार असाल तर आम्ही तुम्हाला अस्मान दाखवल्याशिवाय राहणार नाही.
मुंबई ही जमीन नाही, ही आमची मातृभूमी आहे. ती आमची आई आहे त्यामुळे मुंबईवर वार कराल, तर कोथळा काढल्याशिवाय राहणार नाही. मुंबई तुम्हाला गिळायची आहे. या कमळाबाईचा आणि मुंबईचा संबंध काय? संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जनसंघ नव्हताच. युतीमध्ये आमची 25 वर्षे वाया गेली. वंशवादावर टीका करणाऱ्यांनी आधी स्वतःचा वंश बघावा. मुंबई त्यांच्यासाठी फक्त जमीन आहे. म्हणूनच ते मुंबईच्या विकासाच्या प्रकल्पाला स्थगिती देत आहेत. धारावी हे आर्थिक केंद्र झाले पाहिजे, आणि ते आम्ही करून दाखवणार. असा विश्वास यावेळी उद्धव ठाकरेंनी दिला. वेदांता प्रकल्प गुजरातला गेला, यावर आता ते राजकारण करत आहेत. महाराष्ट्रातून उद्योग निघून जात आहेत. हा प्रश्न ते दिल्लीत ठणकावून का विचारत नाहीत. असा प्रश्न त्यांनी शिंदे सरकारला केला.