’50 खोके, एकदम ओके’, ‘फिफ्टी-फिफ्टी, चलो गुवाहाटी’, विरोधकांच्या घोषणांनी विधानभवन परिसर दणाणला

ओला दुष्काळ जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाली करा’, ‘ईडी सरकार हाय हाय’, ‘फसवी मदत जाहीर करणार्‍या सरकारचा धिक्कार असो’, ‘नही चलेगी, नही चलेगी, दादागिरी नही चलेगी’, ‘सरकार हमसे डरती है ईडी को आगे करती है’, ‘फिफ्टी-फिफ्टी, चलो गुवाहाटी’, ‘गद्दारांना ताट-वाटी, चलो गुवाहाटी, चलो गुवाहाटी’ अशा घोषणा देत महाविकास आघाडीतील पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर आजही दणाणून सोडला. विरोधकांच्या तुफान घोषणाबाजीपुढे फुटीरांची बोलती बंद झाली.

बुधवारपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून विरोधी पक्षाच्यावतीने आजही विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली सरकारला धारेवर धरण्यात आले. ’50 खोके, एकदम ओके’, ‘ईडी सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय’, ‘बेकायदा सरकार हाय हाय’, अशा घोषणांनी विरोधी पक्षांच्या आमदारांनी सरकारला अक्षरशः हैराण करून सोडले.

शिवसेनेत बंडखोरी करून जे आमदार गेले ते विधानभवनात ज्यावेळी येत होते त्यावेळी ‘आले रे आले गद्दार आले’, ’50 खोके, एकदम ओके’ अशा जोरदार घोषणा आक्रमकपणे दिल्या जात होत्या. विरोधकांच्या गर्दीतून शिंदे अणि त्यांच्या समर्थक आमदारांनी कसाबसा काढता पाय घेत आपली सुटका करून घेतली.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही महाविकास आघाडीच्या आमदारांनी महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे सत्तारूढ झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील आमदारांनी विधान भवनाच्या प्रवेशद्वारावरील पायऱयांवर ‘ईडी’ सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.