महाविकास आघाडीने सामान्यांची स्वप्न पूर्ण केली नाहीत. विकासाचे, शेतकरी हिताचे प्रकल्प थांबवले. या आघाडीने रोड ब्लाॅक केले होते. विदर्भ आणि मराठवाडा या भागावर प्रचंड अन्याय करण्यात आला. याचे मला दु:ख होत होते. २०१९ मध्ये अनैसर्गिक आघाडी तयार झाली.म्हणूनच जनतेने भाजपाला पसंदी दिली आहे. कालच आम्ही विश्वासदर्शक प्रस्ताव बहुमतांनी जिंकला. राज्यात नवीन सरकार आल्यानंतर आणि उपमुख्यमंत्री पदभार स्विकारल्यानंतर सर्वात पहिले निमंत्रण नागपूर प्रेस क्लबने दिले आहे. नागपूरमध्ये पहिली प्रेस करताना मला आनंद होत आहे. मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो.नागपूर ही माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. मी सर्वांच्या प्रश्नाला उत्तर देणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मविआवरही निशाणा साधला.
यावेळी बोलताना ते म्हणाले, मी गेली अडीच वर्षे विरोधी पक्षनेता म्हणून कामं पाहिलं. कोरोना काळातही एक दिवस घरी बसलो नाही. लोकांना या काळात सुविधा मिळावी म्हणून प्रयत्न केला. कोरोना झाला तेव्हा सरकारी दवाखान्यात उपचार घेतले. सातव्या दिवशी मी कामाला सुरवात केली. काम करत असताना मविआच्या अंर्तगत असणारी नाराजी दिसत होती. विशेषत: सेनेतील अस्वस्थता दिसत होती. महाराष्ट्रात जे हिंदुत्व बाळासाहेबांनी आणलं त्याच्या पासून सेनेने फारकत घेतली. राष्ट्रवादी, काॅंग्रेस सोबत मी गेलो तर माझे दुकान बंद करीन असं बाळासाहेब म्हणाले होते. ही अस्वस्थता जाणवत होती. या पक्षाच्या जोरावर इतर पक्ष मजबूत होत होते हे सेनेचे आमदार, खासदार, कार्यकर्ते बघत होते. त्यातूनच उठाव झाला. त्याला आम्ही साथ दिली. हे बंड नसून उठाव होता. आग्रह केला असता तर मुख्यमंत्रीपद मिळाले असते पण आम्हाला पदाचा लोभ नाही. सत्तेसाठी हपापलो नाही. मी बाहेर राहून काम करणार होतो. पण भाजपातील वरिष्ठांनी मला आदेश दिला. त्या आदेशाचे मी पालन केलं. याचा मला कमीपणा नाही असे त्यांनी स्पष्ट केलं.
एकनाथ शिंदे माझे सहकारी आहेत. त्यांच्या नेतृत्वात काम करत आहे. माझ संपूर्ण सहकार्य त्यांना असणार आहे. शिंदे सक्षम मुख्यमंत्री होण्याकरता मी सर्वात जास्त पाठिंबा देणार आहे. दोघे मिळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र देशातील नंबर एकच राज्य केल्याशिवाय राहणार नाही. तसेच विर्दभातील सिंचन प्रकल्प, इंडस्ट्रीयल, संस्थांचा विकास करणार आहोत. महाराष्ट्रात विर्दभ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राचा विकास करणारे ताकदीचे सरकार आलेलं आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्र, कोकणावरही अन्याय होऊ देणार नाही. सर्वांकश विकास करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.