म्हणून राऊतांना राज ठाकरे ‘लवंडे म्हणतात”; ‘शरद पवाराला शरम वाटत नाही?’ 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात घेतलेल्या आक्रमक भूमिकेवरुन सध्या राज्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक अशा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच आता मनसेनं थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणामधील संदर्भ देत शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय. एका वृत्तवाहिनीवरील चर्चासत्राचा व्हिडीओ शेअर करत मनसेनं, “…म्हणून संजय राऊतांना राज ठाकरे ‘लवंडे’ म्हणतात” या मथळ्याखाली एक पोस्ट शेअर केलीय.

राज ठाकरे यांनी ठाण्यामध्ये घेतलेल्या १२ एप्रिलच्या सभेमध्ये संजय राऊत यांनी गुढीपाडव्याच्या भाषणावरुन केलेल्या टीकेचा सामाचार घेताना लवंडे असा शब्द वापरला होता. जिकडून सत्ता जाईल त्या बाजूने पडणार पत्रकार अशा अर्थाने त्यांनी हा शब्द आपल्या आजोबांचा म्हणजेच प्रबोधनकार ठाकरेंचा संदर्भ देत भाषणात वापरला होता. त्यावरुनच आता मनसेनं निशाणा साधलाय. “बाळासाहेबांची मशिदीवरील भोंग्या बाबतीतील चित्रफीत पाहिल्यावर आपली बोलती बंद झाल्याने “मला बाळासाहेबांचे पूर्वीचे व्हिडिओ दाखवून प्रश्न विचारू नका” असे पत्रकारांना संजय राऊत म्हणाले. म्हणजे हे ‘महाशय’ स्वतःला बाळासाहेबांपेक्षा मोठे समजायला लागले आहेत का?” असा प्रश्न मनसेनं विचारलाय.