शौचालय घोटाळ्याची व्याप्ती प्रचंड मोठी : संपूर्ण जिल्ह्यातील शौचालय योजनांची आता हवी चौकशी ; माजी मंत्री एकनाथराव खडसे

रावेर : रावेर तालुक्यातील शौचालय घोटाळ्यात एक वा दोन व्यक्तींचा निश्चितच समावेश नसावा, याची व्याप्ती मोठी असून या घोटाळ्याच्या मुळापर्यंत जाऊन काटेकोरपणे तपास करण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे तसेच वैयक्तीक शौचालय योजनेत गटविकास अधिकारी व लेखापाल यांचीदेखील जवाबदारी महत्वाची असल्याने त्यांनी इतके महिने काय पाहिले? असा परखड सवाल राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी उपस्थित केला. संपूर्ण जिल्ह्यातील जिल्हा परीषद शौचालय योजनांच्या चौकशीची मागणी केली आहे.

संपूण जिल्ह्यातील शौचालयांची व्हावी चौकशी

रावेर पंचायत समितीतील दिड कोटींच्या आर्थिक शौचालय घोटाळा समोर आल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गट समन्वयक समाधान निंभोरे व समूह समन्वयक मंजुश्री पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल असून संशयीत पसार झाले आहेत. याबाबत माजी महसूल मंत्री खडसे पुढे म्हणाले की, माझ्या मतदारसंघातील हा विषय असून पोलिसांनी रावेर तालुक्यातील वैयक्तीक शौचालय योजना व सार्वजनिक शौचालय योजनांची संपूर्ण चौकशी करावी व लाभार्थींच्या यादीत नाव असतांना शौचालय बांधकाम केले किंवा नाही, शौचालयाचेबांधकाम जुने दाखवून नवीन शौचालय बांधकामांची बिले काढली का.? वैयक्तीक शौचालय न बांधताच बिल काढली का? शौचालय बांधकामाचे मस्टर व्यवस्थित आहे का? मस्टरवर सह्या असणारे तीच व्यक्ती आहे का? यात गटविकास अधिकार्‍यांनी तसेच लेखापालांनी त्यांची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली का.? या संपुर्ण प्रकरणाची सखोल चौकशी पोलिसांनी करणे गरजेचे असल्याचे माजी मंत्री खडसे यांनी व्यक्त केले

आधीपासून योजनेच्या संशयाच्या भोवर्‍यात

सुरवातीपासून वैयक्तीक शौचालय योजना संशयाच्या भोवर्‍यात असून याला रावेर पंचायत समितीमधील संपूर्ण साखळी जबाबदार आहे. पोलिसांनी गाव पातळीवर लाभार्थींची पडताळणी केल्यास अनेक धक्कादायक नावे पुढे येतील, अशी दाट शक्यता आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल होवून तीन दिवस उलटले आहेत. शौचालय घोटाळ्याचे तपास अधिकारी सहा.पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक म्हणाले की, बँक व पंचायत समितीशी आमचा पत्रव्यवहार सुरू आहे. ऑगस्ट 2020 ते फेब्रुवारी 2022 दरम्यान सर्व टेक्निकल पुरावे गोळा करण्याचे काम सुरू तसेच आरोपींच्या शोधातदेखील पोलिस आहे.शौचालय संदर्भातील सर्व पैलुंची बारकाईने पडताळणी केली जाईल, असे नाईक यांनी सांगितले. सध्या पंचायत समितीत सर्व विभाग ओस पडलेला असून सर्वांच्या नजरा रावेर पोलिसांच्या तपासाकडे लागल्या आहेत.