दीपनगरात दगडफेक : चौघा संशयीतांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

भुसावळ : दीपनगर गेटवर आंदोलनादरम्यान दगडफेक करण्यात आली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर भीम आर्मी जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळेसह चौघांना अटक करण्यात आली होती. संशयीतांची पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी

मंगळवारी रात्री दीपनगरातील कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर बुधवार, 5 रोजी सकाळी दीपनगर गेटवर आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनादरम्यान दगडफेक देखील करण्यात आली होती. या प्रकरणी दीपनगरातील सहाय्यक सुरक्षा अधिकारी धनंजय राजेंद्र सोनवणे (32, दीपनगर वसाहत, दीपनगर) यांनी फिर्याद दिल्यावरून भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळे यांच्यासह आठ संशयीत व अनोळखी जमावाविरोधात भुसावळ तालुका पोलिसात बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी गुरुवारी गणेश सपकाळे, नरेश बिर्‍हाडे, सुरज टिंटोरे, संदीप तायडे या चौघांना अटक केली होती. संशयीताना सुरुवातीला पोलिस कोठडी सुनावण्यात आली तर कोठडीची मुदत संपल्यानंतर शुक्रवारी संशयीत आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे करीत आहेत.