मोक्काच्या भितीनेच गिरीश महाजनांना कोरोना : माजी मंत्री एकनाथराव खडसे

भुसावळ : माजी मंत्री खडसे यांना कोरोना झाल्यानंतर महाजनांनी टिकेची तोफ डागली होती तर गिरीश महाजनांना दुसर्‍यांदा कोरोना झाल्यानंतर माजी मंत्री खडसे यांनी महाजनांवर टिकेचे बाण चालवून टिकेला प्रत्युत्तर दिले आहे. महाजनांवर मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानेच त्यांना कोरोना तर झाला नाही ना? असा संशय आहे, असे विधान राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी बोदवड तालुक्यात माध्यमांशी बोलताना केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे.

महाजनांनी खडसेंवर केला होता हा आरोप

माजी मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथराव खडसे यांना दुसर्‍यांना कोरोना झाला त्यावेळी काही सवाल उपस्थित करत टीका केली. एकनाथराव खडसे यांच्यामागे ईडीची चौकशी लागते, तेव्हाच कोरोना होतो, असे महाजन त्यावेळी म्हणाले होते.

महाजनांच्या टिकेला खडसेंचे प्रत्त्युत्तर

श्री क्षेत्र शिरसाळा येथे दर्शनासाठी माजी मंत्री खडसे हे कार्यकर्त्यांसमवेत आले असता माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला. याप्रसंगी खडसे यांनी माजी मंत्री गिरीश महाजनांना टोला लगावताना सांगितले की, गिरीश महाजनांच्या मागे मोक्का लावण्याची प्रक्रिया बहुतेक सुरू असावी कारण दुसर्‍यांदा त्यांना कोरोना झाला आहे मात्र माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे आहे, गिरीशभाऊ लवकर बरे व्हावे, त्यांची समाजाला आणि महाराष्ट्राला गरज आहे, त्यामुळे मी त्यांच्यासाठी प्रार्थना करणार आहे, असेही ते म्हणाले. यावेळी भुसावळचे नगरसेवक प्रा.सुनील नेवे, मुक्ताईनगरचे माजी पंचायत समिती राजू माळी, पंचायत समितीचे सदस्य मधु राणे, माजी नगरसेवक पुरूषोत्तम नारखेडे, सुमित बर्‍हाटे आदींची उपस्थिती होती.