जितेंद्र कंडारेला २९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी !

 

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित तथा तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारेला आज सकाळी शिक्रापूरच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली. त्याला आज न्यायालयात हजर केले असता २९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांचा जोरदार युक्तिवाद

बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित तथा तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारेला शुक्रवारी जामीन मिळाला होता. त्याची कारागृहातून सुटका होत नाही, तोच शिक्रापूरच्या गुन्ह्यात पोलिसांनी त्याला पुन्हा अटक केली आहे. त्यामुळे जामीन मिळाल्याचा आनंद कंडारेसाठी फार क्षणिक ठरला होता. शिक्रापूरच्या गुन्ह्यात तपासधिकारी पोलीस निरीक्षक सुरज बनगर , पोहेका रऊफ शेख यांच्यासह पथकाने कंडारेला आज सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास कारागृहातूनच अटक करण्यात आली. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करट अटकेची कारवाई पूर्ण करून कंडारेला दुपारी कोर्टात हजर करण्यात आले. न्यायलयात हजर केल्यानंतर विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांनी कंडारेचा या गुन्ह्यात कसा सहभाग आहे. तसेच त्यांनी कशा पद्धतीने सर्व कटकारस्थान रचलेले आहे, हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच कंडारेसह त्याच्या साथीदारांनी संस्थेच्या मालमत्ता विक्री केल्या. खोटे कागदपत्र तयार केले, पावत्या २० टक्के रकमेत मॅचिंग करुन गरीबांचे पैशांचा गैरव्यवहार केला आहे, असेही सांगितले. त्यानंतर न्यायालयाने कंडारेला पाच दिवसांची अर्थात २९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांना अॅड. मोहित माहीनतुरा सहाय्य केले.

कंडारेला शुक्रवारी जामीन शनिवार अटक

बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित तथा अवसायक जितेंद्र कंडारेला पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने इंदोरमधून अटक केली होती. दरम्यान, कंडारेने जामीनसाठी न्यायालयात अर्ज दाखल केलेला होता. त्यानुसार न्यायालयाने त्याचा जामीन शुक्रवारी अर्ज मंजूर केला होता. निकालाची प्रत अद्याप समोर आली नसली तरी पोलीस सूत्रांनी कंडारेचा ५० हजाराच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. तसेच दोन जामीनदार आणि साक्षीदारांवर दबाव टाकू नये, अशा अशा अटी कंडारेला जामीन देतांना घालण्यात आल्या होत्या. दुसरीकडे कंडारेची येरवडा कारागृहातून मुक्तता होण्याआधी शिक्रापूरच्या गुन्ह्यात तपासधिकारी पोलीस निरीक्षक सुरज बनगर, पोहेका रऊफ शेख यांच्यासह पथकाने त्याला आज सकाळी पुन्हा ताब्यात घेतले.

म्हणून शिक्रापूर पोलिसांनी कारागृहातून सुटण्याआधीच केली कंडारेला अटक

बीएचआर घोटाळ्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेला तब्बल सात ते आठ महिने आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाला तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारे याने गुंगारा दिला होता. त्यावेळी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने कंडारेचा राज्यासह परराज्यात देखील शोध घेण्यासाठी पथके पाठवली होती. परंतु कंडारे पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत होता. त्यानंतर २८ जून २०२१ रोजी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने सापळा रचून इंदोर कंडारेला अटक केली होती. कंडारेचा शुक्रवारी अर्ज मंजूर करण्यात आला होता. डेक्कनच्या गुन्ह्याचा अनुभव लक्षात घेता शिक्रापूर पोलिसांनी आधीच काळजी घेत कंडारेला थेट कारागृहातूनच आज सकाळी ताब्यात घेतल्याची चर्चा आहे.

शिक्रापूरच्या फिर्यादीत काय म्हटले होते?

संतोष काशिनाथ कांबळे (वय ५७, रा. लोहगाव, पुणे) यांनी फिर्यादीत म्हटले होते की, ते सुरक्षारक्षकाची नोकरी करतात तर त्यांचे वडील काशिनाथ भगवान कांबळे हे सन १९९० मध्ये शिक्षक पदावरुन निवृत्त झाले आहेत. दरम्यान, सन २०१४ मध्ये कांबळे कुटंुबियांनी बीएचआर पतसंस्थेच्या संदर्भात आकर्षक व्याज देणारी जाहिरात एका वृत्तपत्रात पाहिली होती. संतोष कांबळे यांचे उत्पन्न कमी असल्यामुळे त्यांनी वडीलांसोबत चर्चा करुन जवळ असलेला पैसा बीएचआरमध्ये ठेऊन त्याच्या व्याजावर घरखर्च करण्याची बोलणी केली. त्यानुसार काशिनाथ कांबळे व त्यांच्या पत्नी मंदाकिनी या दोघांनी पुण्यातील बीएचआरच्या भिमा कोरेगाव व शिक्रापुर या दोन्ही शाखांमध्ये विविध योजनांतर्गत वर्षभरासाठी पैसे ठेवेल. नंतर पुन्हा मुदत वाढवली. त्यांच्या ठेवींच्या बदल्यात दोन्ही शाखांनी मिळुन १८ लाख ७ हजार १५९ रुपये त्यांना देय होते. परंतू, मुदत संपल्यानंतरही कांबळे यांना पैसे परत मिळाले नाही.

तुम्हाला फक्त २० टक्के रक्कम मिळेल

कांबळे सन २०१५मध्ये दोन्ही शाखांमध्ये गेले असता शाखा बंद पडल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे संतोष कांबळे हे वडीलांसह जळगावातील एमआयडीसी मख्य शाखेत आले. त्या ठीकाणी त्यांना अवसायक जितेंद्र कंडारे भेटला. त्याने सांगितले की, पतसंस्था बुडाली असून आता माझी अवसायक म्हणून नेमणुक करण्यात आली आहे. आम्ही कर्जदारांकडून वसुली करुन ठेवीदारांच्या फक्त १५ ते २० टक्के रक्कम देत आहोत. बाकीची रक्कम बुडणार आहे. आमचे लोक तुमच्या घरी येतील, ते सांगतील तसे करा, १०० रुपयांच्या स्टॅम्पवर ते म्हणतील तसे लिहुन देत सह्या करा. यानंतर तुम्हाला २० टक्के रक्कम मिळेल, असे सांगत कंडारेने कांबळे यांच्या ठेवी, घराचा पत्ता, फोन नंबर लिहुन घेतला.

कंडारेकडून धक्काबुक्की

कांबळे यांनी पुर्ण रक्कम परत मागीतली असता कंडारेने त्यांना शिव्या देऊन बाहेर काढून टाकले. जेवढे भेटतील तेवढे घ्या नाहीतर एक रुपयाही मिळणार नाही असे बोलुन दोघांना धक्काबुक्की करुन बाहेर काढून दिले. यानंतर वेळोवेळी कांबळे हे जळगावात आले परंतू, बीएचआरच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना कंडारेस भेटु दिले नाही. २० टक्के रक्कम घेऊन पावत्या विका, अन्यथा काहीच मिळणार नाही असेच सर्वजण त्यांना सांगत होते.

दलाल नेमल्याची माहिती जळगावातून मिळाली

दलाल नेमुन त्यांच्याकडून राज्यभरातील ठेवीदारांच्या पावत्या २० टक्क्यांनी खरेदी करीत असल्याची माहिती कांबळे यांना जळगावातून मिळाली हाेती. यानंतर सन २०१९ मध्ये कांबळे यांच्या लोहगाव येथील घरी दोन अनोळखी व्यक्ती आले. आम्ही बीएचआर पतसंस्थेचे लोक असून कंडारेंनी पाठवले आहे असा परिचय त्यांनी दिला. यावेळी त्या दोघांनी ३० टक्के रक्कम देण्याचे सांगीतले. परंतू, कांबळे यांनी मान्य केले नाही. दोघांनी कांबळेंना पुन्हा एकदा विचार करा असे सांगत काही ठेवीदारांच्या शपथपत्रांचे नमुने दाखवले. परंतू, पुर्ण रक्कम पाहिजे असल्याने कांबळेंनी दोघांना माघारी पाठवले.

मोठा कर्जदार तुम्हाला पैसे देण्यास तयार

यानंतर संतोष कांबळे यांनी फेब्रुवारी २०२० मध्ये परत एकदा जळगाव गाठुन कंडारेला भेटण्याचा प्रयत्न केला. आता वडील मयत झाले आहेत, आता तरी पैसे द्या. अशी विनवणी त्यांनी केली. परंतू, यावेळी देखील त्यांना २० ते ३० टक्के रक्कम परत मिळेल असेच सांगण्यात आले. तसेच तुम्ही जर पावत्या देणार नाही, तर इतर कोणीही देऊ शकेल. कारण आता मोठा कर्जदार तुम्हाला पैसे देण्यास तयार असल्याचे आमीषही दिले होते. परंतू, कांबळे यांनी नकार दिला. अखेर त्यांनी २५ नोव्हेंबर २०२० रोजी शिक्रापुर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कंडारेकडून सरकारी पदाचा गैरवापर

बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणी प्रकाश वाणी, सुनिल झंवर, महावीर जैन, अजय राठी, विवेक ठाकरे, अजय ललवाणी, उदय कांकरीया व धरम साखला यांच्यावर दाखल झाला गुन्हा झाला होता. दरम्यान, कंडारे याची कर्जदारांकडून वसुली करुन ठेवीदारांचे पैसे परत करण्याची जबाबदारी असताना त्याने सुरेश जैन, राजेश जैन व इतर पदाधिकाऱ्यांमार्फत ठेवीदारांकडे माणसे पाठवून ठेवींच्या पावत्या २०-३० टक्के रकमेत प्रतिज्ञापत्रासह लिहुन घेऊन पुढील तक्रार देऊ नये यासाठी सरकारी पदाचा गैरवापर केला. खोटी कागदपत्रे तयार करुन फायद्यासाठी अपहार, फसवणूक केली, असेही फिर्यादीत म्हटले आहे.

कंडारेची कसून झाली होती चौकशी

पुणे आर्थिक गुन्हे शाखेने बीएचआर घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार अवसायक जितेंद्र कंडारेने इतर आरोपींसोबत मिळून अवघ्या पाच मालमत्ता विक्री करून तब्बल ४८ कोटी ५६ लाख ८२० रुपयांचा अपहार केला आहे. तसेच सन २०२० मध्ये कंडारे व महावीर जैन या दोघांमध्ये तब्बल १४८ वेळेस संभाषण झालेय. तर कंडारेकडून जप्त हार्डडिस्कमध्ये बीएचआरची सन २०२० ची स्कॅन केलेली मिळून आली होती. एवढेच नव्हे तर, आतापर्यंत झालेल्या फॉरेन्सिक ऑडिटमध्ये अंदाजे ६५० कर्जखाती एफ.डी. मॅचिंगकरून निरंक केल्याचे निष्पन्न झाले आहे. परंतू यापैकी बऱ्याच कर्जदारांच्या कर्ज मागणी अर्ज व एफ.डी. मॅचिंग झालेल्या फाईल्स कार्यालय झडतीमध्ये मिळून आलेल्या नाहीत. या सर्व फाईल्स पुराव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असून त्या कुठे लपवून ठेवल्या आहेत?, यासह इतर महत्वपूर्ण मुद्द्यांवर कंडारेची कसून चौकशी करण्यात आली होती.