भर चौकात गोळ्या झाडून खून करणारे आरोपी अद्यापही मोकाट; तांत्रिक अडचणी येत असल्याची पोलिसांची प्रतिक्रिया

पिंपरी-चिंचवडमध्ये भरदिवसा दहा गोळ्या झाडून योगेश जगताप नावाच्या तरुणाचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी अद्यापपर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र, अंदाधुंद गोळीबार करत योगेश जगतापचा खून करणारे गणेश मोटे आणि अश्विन चव्हाण हे दोघे अद्यापही फरार आहेत. शनिवारी या घटनेला आठ दिवस झाल्यानंतर अद्यापही या आरोपींचा शोध लागलेला नाही. या दोघांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण पोलीस आयुक्तालय कामाला लागल्याचे पाहायला मिळत आहे.

आठ दिवसांपूर्वी गजबजलेल्या काटे पुरम चौकात तडीपार गुंड गणेश मोटे आणि अश्विन चव्हाण या दोघांनी अचानक गोळीबार करत योगेश जगतापचा खून केला होता. या घटनेमुळे अवघे शहर हादरले होते. भर चौकात दहशत निर्माण करत गणेश मोटे आणि अश्विन चव्हाण यांनी पिस्तूलातून अंदाधुंद १० ते ११ गोळ्या झाडल्या होत्या. यात योगेश जगतापचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली अन आरोपींचा शोध सुरू झाला.

या खुनाच्या गुन्ह्यातील सात जणांना सांगवी पोलिसांनी गजाआड केलं आहे. पण, अद्याप ही या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मोटे आणि अश्विन चव्हाण हे फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी सांगवी पोलिसांची तीन पथके, गुंड स्कॉड आणि गुन्हे शाखा युनिट चार तपास करत आहेत.

आरोपींचा शोधात सांगवी पोलिसांनी तीन पथके रवाना केली आहेत. आत्तापर्यंत योगेश जगताप खुनाच्या गुन्ह्यातील सात जणांना अटक केली आहे. लवकरच गणेश मोटे आणि अश्विन चव्हाणला देखील अटक करू. या प्रकरणात अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत, अशी प्रतिक्रिया वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोनपे यांनी दिली आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी चाकण परिसरातील शेलपिंपळगाव येथे पैलवान नागेश कराळेचा गोळ्या झाडून खून करण्यात आल. यात, योगेश दौंडकर आणि इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून अद्याप तीन जण फरार आहेत. त्यांचा चाकण पोलीस शोध घेत आहेत.