महाराष्ट्रात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण वाढू लागल्याने खबरदारी म्हणून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत जमावबंदी आदेशही लागू करण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार की काय? अशी भीती सर्वसामान्यांना वाटू लागली आहे. त्यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भाष्य केले आहे.
टोपे म्हणाले, राज्यात ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत असल्यामुळे त्याचा प्रसार रोखण्यासाठी निर्बंध लागू करण्यात आले आहेत. उपहारगृह, सिनेमागृह आणि बंदिस्त ठिकाणी एकूण क्षमतेच्या 50 टक्केच उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे. रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. केवळ खबरदारी म्हणून ही उपाययोजना करण्यात येत आहे. नागरिकांनी भीती बाळगण्याची गरज नाही. मात्र, सतर्कता बाळगून काळजी घ्यावी.
ओमिक्रॉन रुग्णांवरील उपचारासाठी ऑक्सिजनची फार गरज लागत नाही. केवळ सहव्याधी असणाऱया आणि वृद्धांवर उपचार करताना ऑक्सिजनची गरज भासेल. राज्यात जेव्हा 800 मेट्रिक टन ऑक्सिजन लागेल, तेव्हा लॉकडाऊबाबत विचार केला जाईल. सध्या केवळ प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्यात आल्या असून, त्याचा कोणीही गैरअर्थ काढू नये, असेही आवाहन टोपे यांनी केले.