सांगली : एका कामाचे नियमबाह्य पद्धतीने दोन तुकडे करून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी गुंडेवाडी (ता. मिरज) ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि अन्य एका सदस्याला पदावरून बडतर्फ करण्यात आले. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ही कारवाई केली आहे.
सरपंच भाऊसाहेब शंकर पाटील, तत्कालीन उपसरपंच व विद्यमान सदस्या श्रीमती प्रेमा दिलीप वाघमारे आणि सदस्य धोंडिराम विठ्ठल देसाई यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. २०१७ साली ते निवडून आले होते. आता उर्वरीत काळासाठी त्यांचे पद आणि सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. या प्रकरणात ग्रामसेवक श्रीमती सुनिता जाधव आणि विस्तार अधिकारी एस. टी. मगदूम यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुरु असल्याचे जिल्हा परिषदेने म्हटले आहे.
या प्रकरणी ग्रामपंचायत सदस्य तुकाराम पाटील, श्रीमती निवेदिता पाटील, जालिंदर खांडेकर आणि शोभा पाटील या सदस्यांनी तक्रार दाखल केली होती. त्यावर सुनावणी सुरु होती. गुंडेवाडी येथे विहिरी ते पाण्याची टाकी अशा पाईपलाईनसाठी ५ लाख ५५ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला होता. २०१८ साली हा निधी मंजूर झाला. त्याचे काम ई-निविदा काढून देणे अपेक्षित होते. नियमानुसार ३ लाखांपेक्षा अधिक रकमेचे काम ई-निविदा व्दारेच देणे गरजेचे आहे. मात्र, या कामाचे दोन तुकडे करण्यात आले. विहिरीपासून सुरेश सरक यांचे घर आणि सरक यांचे घर ते पाण्याची टाकी, असे दोन तुकडे करण्यात आले. स्थानिक पातळीवर निविदा काढण्यात आल्या. नियमबाह्य पद्धतीने त्या मंजूर करण्यात आल्या. हे जाणीवपूर्वक करण्यात आल्याचे सुनावणीत स्पष्ट झाले. त्याला मंजुरी व सूचक, अनुमोदक म्हणून तिघांवर कारवाई करण्यात आली. तिघांनाही उर्वरीत काळासाठी पदावरून काढून टाकण्यात आले आहे. सोबतच या प्रकरणात अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याबाबत गंभीर दखल घेतली गेली आहे.