प सांगली– दोनवेळा आलेला महापूर आणि लॉक डाउनमूळे कर्जबाजारी बनलेल्या एक हॉटेल व्यावसायिकाने नैराश्येतून धावत्या रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना सांगली जिल्ह्यातील अंकली गावाजवळ घडल्याने खळबळ उडाली आहे. सचिन सर्जेराव पवार (45) असे आत्महत्या केलेल्या हॉटेल व्यावसायिकाचे नाव असून सांगलीतील गोविंदनगर येथे राहत होता. आत्महत्येच्या या घटनेने सांगलीतील हॉटेल व्यावसायिकांवर शोककळा पसरली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सचिन पवार यांचे सांगली – कोल्हापूर रोडवरील फळ मार्केट जवळशुभम गार्डनहे प्रसिद्ध हॉटेल आहे. गेल्या दोन वर्षांपासून सततच्या लॉकडाऊनमुळे ते आर्थिक विवंचनेत होते. कर्जाचा बोजा वाढत असल्याने ते चिंतेत होते. बँकांचे हप्ते, कामगारांचा पगार, घरखर्च या सगळ्यांची जुळवाजुळव करताना त्यांना पुन्हा कर्ज काढावे लागत होते.
याच विवंचनेतून त्यांनी शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अंकली गावाजवळ रेल्वेखाली उडी घेतली. रेल्वे चालकाच्या ही बाब लक्षात आल्याने त्याने तात्काळ रेल्वे थांबवली.रेल्वे कर्मचार्यांनी पवार यांना उपचारासाठी रेल्वेतूनच मिरजेत दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेनंतरमिरज लोहमार्ग पोलीसघटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून पवार यांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. हॉटेल व्यावसायिकाने आत्महत्या केल्याने लॉकडाऊनकाळात हॉटेल व्यवसायावर झालेले परिणाम स्पष्ट होत आहेत. सर्वच हॉटेल व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सरकारने वर्षभर वीज बिलांसह इतर करांमध्ये सवलत द्यावी.तसेच कर्जाचे हप्ते भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांकडून केली जात आहे.