हेमकांत गायकवाड
चोपडा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सदैव सत्य, अहिंसा आणि सहिष्णुता याचा पाठ देशातील नागरिकांना दिला. भारताला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी त्यांनी सत्य आणि अहिंसा हा मार्ग निवडला. त्यांनी मौनातून अथवा सुप्त क्रांतीतून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले असे प्रतिपादन प्रा.डॉ. एस.बी.कुलकर्णी यांनी चोपडा ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आयोजित त्रिवेणी दिनोत्सव कार्यक्रम प्रसंगी बोलताना केले. यावेळी बोलताना डॉ. कुळकर्णी म्हणाले गांधी जी राष्ट्र पिता तर स्व.लालबहादूर शास्त्रीजी लोकपिता होते. जनमानसात असा लोकप्रिय नेते फार कमी प्रमाणात आहेत. हे दोन्ही नेते पारतंत्र्यातून स्वातंत्र्य व स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशातील विविध विकासासाठी दूरदृष्टी असलेले नेते होते, त्यांना आजच्या जयंती निमित्त अभिवादनासह त्यांच्या राष्ट्रीय विकासाच्या स्वप्न साकारण्यासाठी आपणही कटिबद्ध असल्याचे अभिवचन देण्याचे आवाहन त्यांनी शेवटी बोलताना केले.
ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ‘ज्येष्ठ नागरिक दिन’,तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त व स्मृती भ्रंश निवारण दिन अशा त्रिवेणी कार्यक्रमाचे आयोजन एकत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून प्रा. कुलकर्णी सर बोलत होते.
भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अथवा जीवनात सदैव नीतिमत्तेची शिकवण आपल्या कार्यातून नागरिकांना दिली. त्यांच्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत केरळमध्ये झालेल्या रेल्वे अपघाताची जबाबदारी अंगावर घेऊन नैतिकते नुसार त्यांनी आपल्या रेल्वे मंत्री पदाचा राजीनामा दिल्याची आठवण करून देऊन लालबहादूर शास्त्री हे नीतिमत्ता जागरूक असणारे राजकारणी होते, असेही कुलकर्णी यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. लोकेन्द्र महाजन होते. या वेळी ज्येष्ठ नागरिक संघाच्या नेतृत्वखाली चोपडा महिला ज्येष्ठ नागरिक संघाचीही स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली. यानंतर ज्येष्ठ नागरिक महिला संघाच्या प्रथम अध्यक्षा श्रीमती शकुंतला रमेशलाल गुजराथी यांनी याबद्दलची माहिती दिली. सोबतच त्यांनी येत्या काळात ज्येष्ठ नागरिक महिला संघ हा चोपडा ज्येष्ठ नागरिक संघासोबत कार्य करेल असेही सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व्ही. एच. करोडपती सर यांनी ज्येष्ठ नागरिक संघाच्या विविध कार्यक्रमांबद्दल आणि पुढील वाटचालीबद्दल सविस्तर माहिती दिली.
स्मृतिभ्रंश हा आजार नसून एक मानसिक विकृती
कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष हृदयरोग तज्ञ डॉ. लोकेन्द्र महाजन यांनी स्मृतिभ्रंश या आजाराबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. ते म्हणाले स्मृतिभ्रंश हा आजार नसून ही एक मानसिक विकृती आहे. ज्याने माणूस कमकुवत होतो. त्यामुळे विसरभोळेपणा या मानसिक विकृतीला घालविण्यासाठी आपण आपले मन व शरीर सुदृढ व मजबूत ठेवायला हवे, असेदेखील डॉ. महाजन यांनी सांगितले .
…अन् श्रोते झाले मंत्रमुग्ध कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. लोकेन्द्र महाजन यांनी यावेळी आपल्या सांगितिक कलागुणातून उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना भक्ती गायनाने मंत्रमुग्ध केले. त्यांनी सादर केलेल्या भजनाद्वारे उपस्थितांना सप्तसुरांच्या दुनियेत नेऊन ठेवले होते. डॉक्टर असूनही संगीताची उत्तम जाण असणारा एक कलारसिक आम्ही अनुभवला असे अनेकांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार अनिलकुमार पालीवाल आणि नेरपगार सर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव प्रमोद डोंगरे यांनी केले. या वेळी डि. आर. परदेशी, सौ.कुंदा प्रमोद डोंगरे यांनी ज्येष्ठ नागरिक संघाला प्रत्येकी पाच हजार रुपयांची देणगी सुपूर्द केली. कार्यक्रमास उपाध्यक्ष एम. डब्ल्यू. पाटील, जयदेव देशमुख, प्रा.श्यामभाई गुजराथी, सरोज उर्फ चंदाताई पाटील,सौ.सुनिता कुळकर्णी, कोषाध्यक्ष सुभाष पाटील, शिरीष गुजराथी आदींसह ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.