सराफ बाजारात ज्वेलर्स दुकानात सशस्त्र दरोडा, लाखोंचा ऐवज लुटला.

जळगाव -: शहरातील शनिपेठ पोलीस ठाणे हद्दीत सराफ दुकान लुटण्याचे सत्र सुरुच आहे. गेल्या ६ महिन्यात झालेली ही चौथी घटना आहे. भवानी माता मंदिर समोर असलेल्या सराफ दुकानात दरोडा टाकत दरोडेखोरांनी लाखोंचा मुद्देमाल लुटून नेला आहे. दरम्यान, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ६ दरोडेखोर कैद झाले आहेत.

जळगाव शहरातील सराफ बाजारात भवानी माता मंदिराच्या समोर महेंद्र कोठारी यांच्या मालकीचे सौरभ ज्वेलर्स नावाने दुकान आहे. रविवारी दुकानात २ लोक बाहेरच गेट बंद करून झोपले होते. पहाटे ३.४० च्या सुमारास ३ दुचाकीवर आलेल्या ६ दरोडेखोरांनी दुकानाच्या मागील गल्लीतून ग्रिल तोडत आत प्रवेश केला.

कामगारांना धमकावत लुटला ऐवज

सौरभ ज्वेलर्स दुकानात रात्री २ लोक झोपलेले होते. दरोडेखोरांनी मागील बाजूने प्रवेश करीत त्यांना चाकू लावला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. दुकानातील विविध ८ ते १० कुलूप कापत त्यांनी जवळपास ६०० ग्रॅम सोन्याचे दागिने लुटले. पुन्हा मागील बाजूने बाहेर पडत दरोडेखोरांनी पळ काढला.

सायरन वाजला म्हणून पळाले

दुकानातील सीसीटीव्ही फुटेज उंदरांनी वायर कतारल्याने बंद आहेत. दुकानाच्या बाहेरील बाजूला आर.सी.बाफना ज्वेलर्सचे सुरक्षारक्षक असल्याने चोरटे त्याबाजूने आले व गेले नाही. ४ वाजेच्या सुमारास शनिपेठ पोलिसांच्या वाहनाचा सायरन वाजल्याने दरोडेखोरांनी आटोपते घेतले.

पोलीस अधीक्षकांची भेट

घटनेची माहिती मिळताच पहाटेपासून पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी पोहचला. घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप गावीत यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी भेट दिली. पोलीस अधीक्षक यांनी शहरातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांची शनिपेठ पोलीस ठाण्यात बैठक घेतली.