क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार २०२४ वितरण आणि ३५ गोर गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन सावित्रीमाई फुले जयंती साजरी

दीपनगर – दीपनगर येथे माता सावित्रीबाईच्या त्याग आणि अथक परिश्रमातूनच आजची स्त्री सामर्थ्यवान बनली आहे. मी आज या पदावर केवळ सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आहे.  महानिर्मितीच्या पहिल्या महीला मुख्य अभियंता विजया बोरकर यांचं वक्तव्य सदर कार्यक्रमास दीपनगर विज केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत मानव सेवा ईश्वर सेवा कल्याण संघ आणि क्रांतिसूर्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण, दर्जेदार व संस्कारशील शिक्षण मिळावे. विद्यार्थ्यांमध्ये मानवी मुल्ये रुजावीत यासाठी तळमळीने कार्य करणा-या जळगाव जिल्ह्यातील १२ शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले सेवा पुरस्कार २०२४ देऊन गौरविण्यात आले.

यावेळी मानव सेवा ईश्वर सेवा संस्थेच्यावतीने निंभोरा येथील जि.प. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून विद्यार्थी दत्तक उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. शिक्षिका भारती सुदाम अवचारे यांच्या सावित्रीबाई वंदन गिताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भुसावळ वीज केंद्राचे मुख्य अभियंता मोहनजी आव्हाड होते. प्रमुख अतिथी म्हणून महानिर्मिती च्या पहिल्या महीला मुख्य अभियंता विजया बोरकर प्रकल्प ६६० चे मुख्य अभियंता विवेक रोकडे आणि उप मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मुकेश मेश्राम उपस्थित होते.

प्रमुख वक्ता म्हणून लाभलेले ज्येष्ठ विचारवंत मार्गदर्शक विदयार्थी प्रिय सामाजिक नेते प्रा. डॉ. जतिन श्रीधर मेढे यांनी संत नामदेव संत तुकाराम ते छत्रपती शिवराय , महात्मा जोतीराव फुले , सावित्रीमाई फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा प्रबोधनात्मक सुरेख मेळ साधत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. वीज कर्मचारी आणि शिक्षक दोघंही प्रकाश पेरण्याचे कार्य करतात. वीज कर्मचारी घरातील अंधार दूर करतात तर शिक्षक समाजातील अज्ञानरूपी अंधार दूर करतात. क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले या पुरस्काराच्या प्रकाश किरणांनी आपण विद्यार्थ्यांमध्ये समतेची…. ममतेची…. ज्ञानज्योत पेटवून आधुनिक भारतासाठी आदर्श विद्यार्थी घडवावेत. कारण हुशार विदयार्थी शाळेत घडतात तर वाईट विदयार्थी देखील शाळेतच घडतात हे आपण कदापी विसरता कामा नये.असे मौलिक विचार यावेळी त्यांनी मांडून उपस्थितांमध्ये एक नव उर्जा निर्माण केली. यावेळी लक्ष्मी अनुप माळी या विद्यार्थीनीने आपले मनोगत व्यक्त केले. सत्कारार्थी मधून चाळीसगावच्या प्रा डॉ उज्वला पंकज नन्नवरे आणि मुक्ताईनगरचे अ फ भालेराव यांनी बहारदार संस्कारक्षम चारोळी आणि लघु कथाच्या माध्यमातून आपल्या मनोगताची मांडणी केली.

प्रस्तावनेत मानव सेवा ईश्वर सेवा संस्थापक मोहन सरदार यांनी संस्थेच्यावतीने सुरु असलेल्या मानवी सेवा, शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची माहिती उपस्थितांना दिली. जागतिक इतिहासात महिला उत्थानासाठी जे कार्य क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांनी केले. जो त्रास सहन केला. जो त्याग केला. जी सेवा केली. जे बलिदान दिले त्यास तोड नाही. या पुरस्काराची उंची खुप मोठी आहे. या पुरस्काराच्या उजेड किरणांनी आयुष्यात आपल्याला कार्य करण्याची प्रेरणा मिळणार आहे. आपण प्रत्येकाने विद्यार्थांना मदत करावी असे भावनिक आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहनजी आव्हाड, पहिल्या महीला मुख्य अभियंता विजया बोरकर, मुख्य अभियंता विवेक रोकडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख अतिथी मध्ये उप मुख्य अभियंते अशोक भगत, रविंद्र सोनकुसरे, मनोहर तायडे, संतोष वकारे, प्रशांत लोटके तसेच उप मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मुकेश मेश्राम आणि अधिक्षक अभियंता सुमेध मेश्राम, रविंद्र डांगे, महेश महाजन, सुनिल पांढरपट्टे  , अशोक घाडगे, योगेश इंगळे, अतुल पवार , संजय हिरवे, डॉ कल्पना बावा, संदीप वाघ, डॉ रोहीणी गायकवाड, शारदा ईशी, सुनिता सरदार, वर्षा खंडारे, मिलिंद खंडारे आणि सामाजिक कार्यकर्ते प्रकाश सरदार, पत्रकार प्रकाश तायडे सुनिल आराक आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम सोहळयाचे दिमाखदार आणि अभ्यासू सुत्रसंचलन हर्षिता जांभुळकर यांनी केले. आभार विनायक बोराटे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाबा जावळे, अनुप माळी, महेश झगडे, छगन पवार, शैलेष नारखेडे, प्रफुल निकम, मोहीनी फेगडे, विनायक बोराटे, नंदकिशोर उमाळे, महेश चरखे, किरण चोपडे, संदीप उमाळे, विनायक जाधव, संदीप उमाळे, संतोष गिऱ्हे, मनिषा माळी, प्रविण बोदडे, इरफान पठाण यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी सर्व विभाग प्रमुख, संघटना प्रतिनिधी, पत्रकार, अधिकारी कर्मचारी, कंत्राटदार,कंत्राटी कामगार तसेच मोठया संख्येने महीला वर्ग उपस्थित होता.