राज्यातील सर्वाधिक नोंदी जळगावला; जिल्ह्यात 3 लाख 9 हजार कुणबी नोंदी

जळगाव – मराठा समाजाला मराठा-कुणबी, कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने अभिलेखांची तपासणी, तसेच प्रशासनाकडून नोंदी तपासण्यात येत असून, अद्याप तीन लाख नऊ हजार ८३९ कुणबी नोंदी आढळल्या आहेत.

राज्यातील या सर्वाधिक नोंदी आहेत. 

मराठा समाजाला मराठा-कुणबी, कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. या समितीची व्याप्ती संपूर्ण राज्यासाठी वाढविण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला असून, जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व कार्यालयांत अभिलेख तपासणीची कार्यवाही सुरू आहे.

तहसील कार्यालय, भूमिअभिलेख कार्यालयाच्या स्तरावर पेरेपत्रक, कूळ नोंदवही, हक्क नोंदपत्रक, कोतवाल बुक नक्कल, टिपण बुक, योजना बुक तपासणीची कार्यवाही युद्धपातळीवर करण्यात आली आहे. पंधरा तालुक्यांमध्ये १९४८ ते १९६७ या कालावधीतील एकूण ८२ लाख १८ हजार ८५४ अभिलेख नोंदी तपासण्यात आल्या.

त्यात कुणबी जातीच्या तीन लाख नऊ हजार ८४९ नोंदी आढळल्या. अभिलेखांची तपासणी व अभिलेख उपलब्ध करून देण्याबाबतची कार्यवाही विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी या कामाला गती मिळावी, यासाठी व समन्वयासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष स्थापण्यात आला असून, महसुली अभिलेख, शिक्षण विभाग, इतर शासकीय विभागाकडील अभिलेख वगळता कुणबी, कुणबी मराठा, मराठा- कुणबी जातीचे अभिलेख किंवा पुरावे असलेल्या नागरिकांनी विशेष कक्षात माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

या विभागात केली तपासणी

जिल्ह्यातील शैक्षणिक विभाग

पोलिस विभाग

कारागृह विभाग

जिल्हा उपनिबंधक

इतर सर्व संबंधित यंत्रणा

jalgaonsandesh

jalgaonsandesh