उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. 45 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक असलेले सरकारी शिक्षक राजेश गौतम यांची त्यांचीच पत्नी पिंकीने हत्या केली. पिंकीचे एका गवंडीसोबत प्रेमसंबंध होते. यावरून नवरा- बायकोमध्ये नेहमी वाद होत होते. या वादातून पिंकीने आपल्या नवऱ्याची हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
राजेश गौतम यांनी 2021 मध्ये कानपूरमधील कोयला नगर येथील त्यांच्या घराचे बांधकाम सुरू केले होते. यासाठी राजेशने गवंडी शैलेंद्र सोनकर याला कामावर ठेवले होते. बांधकामाच्या संदर्भात शैलेंद्र राजेशच्या घरी जात होता. यावेळी त्याची राजेशची पत्नी पिंकीसोबत भेट झाली. पिंकी दिसायला सुंदर असल्यामुळे ती शैलेंद्रला आवडू लागली होती. हळूहळू पिंकीही शैलेंद्रच्या प्रेमात पडली. राजेश घरी नसताना शैलेंद्र कधीकधी पिंकीला भेटायला जात असे. ही गोष्ट राजेशला समजल्यावर त्याने शैलेंद्रचं घरी येणं बंद केल होत. परंतु हे त्याच्या पत्नीला आवडल नाही. याचं कारणावरुन अनेकदा त्यांच्यात भांडणे होत. या सगळ्याला कंटाळून पिंकी आणि शैलेंद्रने राजेशला त्यांच्या मार्गावरून हटवण्याचा कट रचला.
चार लाख रुपयांची सुपारी देऊन पिंकीने पतीची हत्या केली
पिंकी आणि शैलेंद्रने मिळून राजेशच्या हत्येसाठी चार लाखांची सुपारी दिली होती. जर राजेशचा मृत्यू अपघाती झाला तर राजेशच्या नावावर तीन कोटी रुपयांचा विमा क्लेम मिळेल व राजेश सरकारी शिक्षक असल्यामुळे त्याची प्रॉपर्टीही आपल्यालाच मिळेल म्हणून तिने आधीच सगळे व्यवहार करुन ठेवले होते.
4 नोव्हेंबरला राजेश घरातून फिरायला निघाला असताना शैलेंद्र आणि त्याच्या साथीदारांनी राजेशला त्यांच्या कारने चिरडले. पोलिस हे प्रकरण अपघात मानत होते, मात्र राजेशच्या भावाने पोलिसांना हत्येची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी राजेशच्या मुलाशीही याबाबत विचारणा केली. राजेशच्या मुलाने पोलिसांना सांगितले की, घटनेच्या दिवशी तोही वडिलांसोबत मॉर्निंग वॉकसाठी जात होता, मात्र आईने त्याला घरातील बाथरूममध्ये कोंडून ठेवले होते.यानंतर एक सीसीटीव्ही आढळून आला, ज्यामध्ये राजेशला चिरडणारी कार त्याचा पाठलाग करताना दिसत आहे. यावरुन पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला. तपासादरम्यान गवंडी आणि राजेशची पत्नी दोषी असल्याचे स्पष्ट झाले.