जळगाव – येथील पंचायत समितीमध्ये झालेल्या आणि राज्यभर गाजलेल्या दीड कोटी रुपयांच्या टॉयलेट घोटाळा प्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी (ता. ६) न्यायालयात आणखी ३० संशयितांविरुद्ध दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले.
यामुळे या प्रकरणी चार्जशीट दाखल झालेल्या संशयित आरोपींची संख्या ५५ झाली आहे.
या प्रकरणी काहीतरी अपहार होत असल्याची शंका येताच पंचायत समितीच्या तत्कालीन गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी एक चौकशी समिती नेमली होती आणि समितीच्या अहवालात घोटाळा निश्चित होताच पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले होते. यात या योजनेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसह पंचायत समितीचे लेखापाल व काही दलाल अडकले असल्याचे फिर्यादीत म्हटले होते.
स्वच्छ भारत योजनेचा स्वच्छतागृह बांधण्याच्या निधीचा यात संशयितांनी गैरव्यवहार केला आहे. संशयितांकडून पोलिसांनी आतापर्यंत १ कोटी १० लाख वसूल केले आहेत.
हा वसूल निधी पुन्हा शासकीय तिजोरीत जमा करण्यात आला आहे.
या प्रकरणी रावेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कैलास नागरे आणि तपासी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक यांनी कसून तपास करून अटकसत्र व वसुली सत्र राबविले होते. नाईक यांनी आधीच २५ संशयितांविरुद्ध येथील न्यायालयात चार्जशीट दाखल केले होते. या प्रकरणी यापुढेही कारवाई सुरुच राहील आणि शासकीय गैरव्यवहाराचे पैसे वसूल केले जातील, असे तपास अधिकारी व सहायक निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांनी सांगितले.