तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आणि मंत्री उदयनिधी स्टॅलिन हे वादग्रस्त विधानांमुळं नेहमीच चर्चेत असतात. आता आणखी एक वादग्रस्त विधान उदयनिधी स्टॅलिन यांनी केलंय.
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्याबाबत विधान करताना स्टॅलिन यांची जीभ घसरली.
चेन्नई (तामिळनाडू) – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या विधवा असून, त्या आदिवासी समाजाच्या आहेत. त्यामुळंच त्यांना संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन समारंभाला भाजपानं निमंत्रित केले नव्हतं, असं वादग्रस्त विधान मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी बुधवारी केलंय. त्यामुलं आता नवीन चर्चांना तोंड फुटणार.
स्टॅलिन यांचा भाजपावर हल्लाबोल : भाजपानं नवीन संसदेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी सर्वांना आमंत्रित केलं होतं, परंतु देशाच्या प्रथम नागरिक म्हणजेच राष्ट्रपतींना आमंत्रित करण्याची तसदी भाजपानं घेतली नाही. महिला आरक्षण विधेयक संसदेत मांडलं, त्यासाठी अनेक अभिनेत्रींनाही आमंत्रित करण्यात आलं होतं, तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना यापासून दूर ठेवण्यात आलंय. तसंच सनातन धर्माविरोधात आम्ही आवाज उठवत राहू, असं उदयनिधी स्टॅलिन म्हणाले.
सनातन धर्म संपवणार : लोकांनी माझ्या डोक्याची किंमतही ठरवून टाकली आहे. माझा खून करण्याचा काहींचा डाव आहे. मला या सर्व गोष्टींचा अजिबात त्रास होत नाही. द्रविड मुन्नेत्र कळघमची स्थापना सनातन धर्म संपवण्यासाठीच करण्यात आली आहे. आमचं उद्दिष्ट साध्य होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असं विधान उदयनिधी स्टॅलिन यांनी केलंय.
सनातन धर्माला विरोध : यापूर्वीही उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावर एक वक्तव्य केलं होतं. त्यांच्या वक्तव्यावरुन संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत होता. अशातच आता पुन्हा एकदा उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत वक्तव्य केलंय. उदयनिधी स्टॅलिन यांनी मदुराई येथील एका कार्यक्रमात बोलताना हे वक्तव्य केलंय. सनातन धर्माविरोधात आम्ही आवाज उठवत राहू, असंही ते म्हणाले. या विधानावरुन आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.