जळगाव – तालुक्यातील कंडारी येथील २४ वर्षीय राहुल भिल याच्या आकस्मिक मृत्यूचा गुंता अखेर एमआयडीसी पोलिसांनी सोडविला. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून संशयितास अटक करण्यात आली आहे.
मृत तरुण हरविल्याची तक्रार नशिराबाद पोलिस ठाण्यात दाखल असल्याने मारेकऱ्यांना अटक करून सर्व पुराव्यांसह एमआयडीसी पोलिसांनी नशिराबाद पोलिसांच्या स्वाधीन केले.
राहुल ऊर्फ गोलू युवराज भिल (वय २४, रा. कंडारी, ता. जळगाव) रविवारी (ता. २) सकाळी दहाला गावातून निघाला होता. त्यानंतर ग्रामस्थ, नातेवाईकांनी त्यास सायंकाळी साडेसातपर्यंत गावात फिरताना पाहिले होते. नंतर तो घरी आला नव्हता, म्हणून त्याचे वडील युवराज भिल यांनी नशिराबाद ठाण्यात गुरुवारी (ता. ६) हरविल्याची तक्रार दिली होती.
त्याच दिवशी सायंकाळी पाचला राहुल ऊर्फ गोलू याचा मृतदेह रायपूर (ता. जळगाव) शिवारातील वाघूरच्या पाटचारीजवळ कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.
संशयास्पद मृतदेह मिळाल्याने राहुलचा कोणीतरी खून केल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने एमआयडीसी पोलिसांनी तपास सुरू केला. त्यातून तरुणाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. रविवारी राहुल गावातील जयराम धोंडू कोळी व बादल परदेशी यांच्याबरोबर दिवसभर दारू पीत असल्याची माहिती मिळाली.
मृतदेह पाईपमध्ये फसवला
भूषण पाटील याला ताब्यात घेतल्यावर पोलिसांनी चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली व चौकशीत घटनाक्रम सांगितला. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास कंडारी गावातून राहुल ऊर्फ गोलू यास दुचाकीवर मध्यभागी बसवून घेऊन गेलो. दुचाकी जयराम चालवत होता व भूषण मागे बसला होता.
संशयित जयराम व भूषण याने त्याला सायंकाळी जयराम याच्याशी भांडण केल्याच्या रागाच्या भरात मारहाण केली होती. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याची ओळख पटू नये, म्हणून त्याचा मृतदेह पाटचारीखालील पाईपमध्ये लपवून ठेवला होता व पाईपला दोन्ही बाजूंनी दगड लावले होते. जयराम याने राहुलच्या अंगावरील कपडे काढून कुठेतरी फेकून दिले होते.