आजपासून मोबाइलवर अनवाँटेड कॉल व मेसेज येणार नाहीत. देशातील जियो, एअरटेल व व्होडाफोन-आयडिया या प्रमुख कंपन्यांनी स्पॅम कॉल रोखण्यासाठी त्यांच्या सिस्टिममध्ये फिल्टर लावले आहे. ‘एआय’च्या मदतीने स्पॅम मेसेज आणि कॉल्स नेटवर्कवरच ब्लॉक होतील, असा कंपन्यांचा दावा आहे. ट्रायने कंपन्यांना ३० एप्रिलची मुदत दिली हाेती. कंपन्यांची चाचणी यशस्वी ठरल्याचे ट्रायच्या एक वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. सोप्या शब्दांत सांगायचे म्हटले तर आजवर आपल्याला मोबाइलवर कॉल आल्यानंतर कळायचे की तो स्पॅम कॉल होता. नंतर आपण तो नंबर ब्लॉक करायचो. आता तो नंबर आधीच नेटवर्कवर ब्लॉक होऊन जाईल व आपल्यापर्यंत कॉल येणार नाही.
स्पॅम पूर्णपणे बंद होतील का?
हो, तूर्तास तरी असेच दिसते. सुरुवातीचे काही दिवस वा आठवड्यापर्यंत स्पॅम कॉल अद्यापही बंद न झाल्याच्या तक्रारी येऊ शकतात. तांत्रिक त्रूट शक्य आहे, मात्र ती सुधारली जाऊ शकते. एक मात्र नक्की की, स्पॅम कॉल किंवा मेसेजमध्ये तब्बल ९० टक्क्यांपर्यंत घट येईल.
लॉगआऊट करणे विसरला तर… यावरही काम सुरू आहे. डबल फिल्टरेशनच्या माध्यमातून जे क्रमांक लाॅगआऊट झालेले नाहीत त्यांनाही ब्लॉक करता येईल. तूर्त या तंत्रज्ञानाची चाचणी सुरू झालेली नाही.
स्पॅम कॉल्स रोखण्यात अडचणी तरी काय आहेत?
काही लोक क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन आदींसाठी वेबसाइट वा ईमेलद्वारे बँक किंवा वित्तीय संस्थांशी संवाद साधतात. संवाद पूर्ण झाल्यानंतर ते लॉगआऊट होत नाहीत. त्यांना जास्त स्पॅम कॉल येतात. मात्र आता ज्या लोकांनी लॉगआऊट केले आहे किंवा एखाद्या सेवेची माहितीच घेतली नाही, त्यांच्या क्रमांकावर येणारे स्पॅम कॉल एआयद्वारे ओळखले जाऊ शकतात हे नक्की. मग ते नेटवर्कवरच ब्लॉक होऊ शकतील.
ट्रायने यापूर्वीही डीएनडी (डू नॉट डिस्टर्ब) सेवा सुरू केली होती. कंपन्यांकडून ही सेवा घेतल्यानंतरही ग्राहकांना स्पॅम कॉल व मेसेजेस यायचेच. याबाबत ट्रायच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, डीएनडी सेवेनंतरही स्पॅम कॉल-मेसेज सुरूच राहिले हे खरेच आहे. मात्र त्यांचे प्रमुख खूप घटले होते. डीएनडी सेवेत नेटवर्कवरच कॉल रोखण्याची व्यवस्था नव्हती. मात्र आता स्पॅम कॉलला अटकाव घालणे सोपे झाले आहे.