महाराष्ट्र – सरकारी योजनांचा लाभ पात्र लोकांना मिळवून देण्यासाठी आता सरकारच्या माध्यमातून ‘शासकीय योजनांची जत्रा’ हा उपक्रम सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.
त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात ‘शासकीय योजनांची जत्रा’ होणार आहे. किमान 75 हजार लाभार्थ्यांना या शासकीय योजनांचा लाभ दिला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
लाभार्थींपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी शासकीय योजनांची जत्रा उपक्रम राबविला जाणार आहे. शेवटच्या गरजू लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी यंत्रणांनी सुक्ष्म नियोजन करावं. प्रत्येक यंत्रणेचा या जत्रेमध्ये सहभाग राहणार आहे. यंत्रणेने या जत्रेच्या दृष्टीने काम करत असलेल्या कामांचा अहवाल जिल्हा जनकल्याण कक्षाला दररोज सादर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षांनिमित्त 36 विभागामार्फत 75 शासकीय योजनांची माहिती आणि लाभ प्रत्येक जिल्ह्यात किमान 75 हजार लाभार्थीना देण्यात येणार आहे.
प्रत्येक जिल्ह्यात शासकीय योजनांची जत्रा ; ७५ हजार लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्याचा #महासंकल्प #शासकीय_योजनांची_जत्रा pic.twitter.com/nqkFeLprRk
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 13, 2023
शासकीय योजनांच्या जत्रेचा उद्देश काय?
सरकारी योजनांचे लाभार्थी असणाऱ्यांना जलद, कमी कागदपत्रामध्ये आणि शासकीय निर्धारित शुल्कात योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. तीन दिवस सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी एकाच ठिकाणी राहणार आहेत. यामध्ये योजनांचा लाभ मिळवून देणे, आवश्यक कागदपत्रे प्रमाणित करणे, योजनांची माहिती देणे हा मूळ उद्देश या जत्रेचा आहे. जत्रेच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना थेट जनतेशी संवाद साधता येणार आहे. यामुळे जनतेच्या समस्या जवळून पाहता येणार असल्याने त्या समस्येवर उपाययोजना करता येणार आहेत. विविध योजनांसाठी पात्र असणाऱ्या आणि लाभ घेणाऱ्या लाभार्थीना मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून लाभाबाबतचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. विविध योजनांसाठी पात्र लाभार्थीना योजना मंजुरीची पत्रे देण्याचा कार्यक्रम जिल्हावार लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत घेण्यात येणार आहे.
प्रशासन, शासन आणि जनता एकत्र
प्रशासन, शासन आणि जनता एकत्र आल्यास सामान्य जनतेच्या कोणत्याही समस्या राहणार नाहीत. हे हेरुन शासकीय योजनांची अंमलबजावणी गतीमान करण्यासाठी एकाच छताखाली सर्व अधिकारी-जनता जत्रेच्या रुपात आणून जनतेला विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात येणार आहेत. या जत्रेनुसार सर्व विभागांनी आपापल्या योजनांची माहिती, शासन निर्णय याबाबत पूर्वतयारी करावी. योजनानिहाय लाभार्थी निवड, त्यांचे अर्ज भरून घेणे याबाबतही तयारी करावी लागणार आहे.