साईबाबांवर आक्षेपार्ह विधान करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री यांच्याविरुद्ध तक्रार दाखल

बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांच्याविरुद्ध मुंबई येथील वांद्रे पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शास्त्री यांनी शिर्डीचे थोर संत साईबाबा यांच्यावर आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

जबलपूर येथील पनागरमध्ये आयोजित केलेल्या श्रीमद्भागवतकथेच्या शेवटच्या दिवशी शास्त्री यांना साई बाबांवरून प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, साईबाबांना मी देव मानत नाही. कोल्ह्याची कातडी पांघरून कुणी वाघ होऊ शकत नाही. ‘कोणतेही संत ते आपल्या धर्माचे असोत अथवा दुसऱ्या त्यांना ईश्वराचं स्थान देता येणार नाही. कोणतेही संत ते तुलसीदास असतील, सूरदास असतील किंवा इतर कोणतेही ते केवळ महापुरुष आहेत, युगपुरूष आहेत, परंतु ते देव नाहीत. आपण साईबाबांना संत म्हणू शकतो, फकीर म्हणू शकतो, पण देव नाही, असं धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले होते.

या विधानाविषयी वृत्त प्रसारित झाल्यानंतर शास्त्री यांच्या विरुद्ध संताप व्यक्त करण्यात येत होता. या विधानामुळे त्यांच्याविरुद्ध शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवा सेनेचे नेते राहुल कनाल यांनी वांद्रे येथे तक्रार दाखल केली आहे. या राज्यातील श्रद्धाळू जनता त्यांचे धर्म आणि धार्मिक निष्ठा यांच्या पलिकडे जाऊन साई बाबांची भक्ती करते. त्यामुळे धीरेंद्र शास्त्री यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राहुल कनाल यांनी आपल्या तक्रारीत केली आहे.