महाराष्ट्र – मार्च महिन्याच्या सुरूवातीपासून राज्यात अचानक उष्णता वाढल्याने उन्हाचा चटका जाणवत आहे. राज्यातील किनारपट्टीय भागामध्ये तापमान 37 अंशांच्या पुढे असेल आणि तापमानात सरासरीपेक्षा 4.5 अंशांनी वाढ झाल्यास उष्णतेची लाट समजली जाते.
शनिवारी (ता. 11) सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये सांताक्रुझ येथे राज्यातील उच्चांकी 37.5 अंश तापमानाची नोंद झाली.
मागच्या काही दिवसांपासून हवामान दमट झाल्याने राज्यात पुन्हा पावसाला पोषक हवामान होऊ लागले आहे. राज्यात उद्यापासून (ता. 13) वादळी पावसाची शक्यता असून, आज (ता. 12) मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह कमाल तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
दरम्यान मागच्या 24 तासांमध्ये सांताक्रूझ येथे राज्यातील उच्चांकी 37.5 अंश तापमानाची नोंद झाली. तर रत्नागिरी येथे 37.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याने दोन्ही ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे. उर्वरित राज्यात बहुतांशी ठिकाणी कमाल तापमान 34 ते 36 अंशांच्या दरम्यान होते. रात्रीच्या किमान तापमानातही चढ-उतार सुरू आहेत.
पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे उत्तर बिहारपासून छत्तीसगड, विदर्भ, तेलंगणा ते कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झाल्याने आजपासून (ता. 12) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर आज (ता. 12) उत्तर महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
दरम्यान मागच्या 24 तासांत पुणे 33.8 (14.7), जळगाव 35.6 (15), धुळे 34 (12.5), कोल्हापूर 34.1 (20.2), महाबळेश्वर 29.1 (16.8), नाशिक 32.7 (16.2), निफाड 33.4 (12.5), सांगली 34.9 (19.8), सातारा 34.7 (17.5), सोलापूर 36.2 (21.4), डहाणू 31.3 (21.3), रत्नागिरी 37.4 (21.7), छत्रपती संभाजीनगर 33.2 (15.2), नांदेड 35.2 (20), परभणी 35.3 (19. 4), अकोला 36.2 (17.6), अमरावती 36.2 (19.3), बुलडाणा 33.2 (19.2), चंद्रपूर 36 (20), गडचिरोली 36 (16.6), गोंदिया 34.2 (16.4), नागपूर 34.4 (16.8), वर्धा 35.4 (19.8), वाशिम 36.2 (17.8), यवतमाळ 35 ( 18) तापमानाची नोंद झाली.