‘भक्त’ हा शब्द मागील काही काळात श्रद्धेपेक्षा डिवचण्यासाठी जास्त वापरला जातो. सोशल मीडियावर आपण अनेक पोस्टखालच्या कमेंट बॉक्समध्ये असे वाद पाहिलेच असतील. अनेकांची राजकारण्यांवर इतकी श्रद्धा असते की आपल्या या भक्तीचं प्रदर्शन करण्यासाठी ही मंडळी कोणत्याही थराला जाऊ शकतात. असंच एक उदाहरण सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. रामलल्लाची भूमी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या अयोध्या नगरीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे चक्क एक मंदिर उभारलेले आहे. योगींचा समर्थक प्रभाकर मौर्य यांनी हे मंदिर उभारलं आहे.
प्राप्त माहितीनुसार, प्रभाकर हे सकाळ-संध्याकाळ मंदिरात आदित्यनाथ यांच्या मूर्तीची आरतीही करतात. एवढंच नाही तर प्रभाकर मौर्य यांनी मुख्यमंत्री योगींच्या समर्थनार्थ शेकडो गाणी देखील गायली आहेत. या मंदिरासाठी प्रभाकर यांनी स्वतःच्या युट्युब चॅनेलवरून कमावलेले ५ लाख रुपये खर्च केले आहेत प्रभाकर यांचे युट्युबवर लाखो सबस्क्राइबर्स आहेत.
रामजन्मभूमी मंदिर भूमिपूजनाचा योग साधून ५ ऑगस्ट २०२० ला योगी आदित्यनाथ यांच्या मंदिराचे सुद्धा उद्घाटन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकीकडे अयोध्येत राममंदिराच्या बांधणीचा पाया रचला जात होता तर तिथून अवघ्या २० -२५ किमी दूर पुरवा या गावात मौर्य यांनी योगींच्या मंदिराचे सुद्धा उद्घाटन केले होते.
आपण व्हिडीओमध्ये पाहू शकता की, मंदिरात योगी आदित्यनाथ यांची धनुर्धारी मूर्ती साकारण्यात आली आहे. ५ फूट ४ इंच लांब ही प्रतिमा योगी आदित्यनाथ यांची हुबेहूब प्रतिकृती आहे.
योगी आदित्यनाथ यांच्या मंदिराची झलक
दरम्यान, केवळ योगी आदित्यनाथच नव्हे तर यापूर्वी भारतात काही ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मूर्ती साकारून सुद्धा मंदिर साकारण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर याआधी सोनिया गांधी यांची सुद्धा हातात कमळ व लाडू घेऊन देवी रूपात मूर्त साकारण्यात आली होती.