पेटीएमच्या ग्राहकांना अजून एक झटका, फास्टॅगही होणार बंद

पेटीएमच्या फास्टॅग ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण, पेटीएम बँकेवरील प्रतिबंधामुळे त्याच्या फास्टॅग सेवेवरही परिणाम होणार आहे. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या सूचनांनुसार पेटीएम फास्टॅगमध्ये 15 मार्च नंतर रिचार्ज करता येणार नाही.

रिझर्व्ह बँकेने गेल्या महिन्यात पेटीएम पेमेंट बँकेवर कारवाई केली होती. 29 फेब्रुवारीपासून या बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध लावण्यात आले होते. त्याची मुदत आता 15 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. 15 मार्चनंतर पेटीएम पेमेंट बँकेशी संबंधित ग्राहक खाते, प्रीपेड उपकरण, वॉलेट, नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड आणि फास्टॅग अशा कोणत्याही सेवेत टॉपअप करता येणार नाही.

त्यामुळे आपल्या फास्टॅगसाठी पर्यायी सुविधांचा वापर करण्याची सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिली आहे. जर कुणाकडे पेटीएम फास्टॅग आहे तर त्यातील सध्या असलेल्या रकमेचा वापर करून टोल भरता येईल. पण, 15 मार्चपर्यंत ती रक्कम संपवावी लागेल कारण त्यानंतर त्यात पुन्हा रक्कम भरता येणार नाही. त्यामुळे गैरसोय होऊ नये यासाठी आरबीआयने अधिकृत केलेल्या अन्य बँकांच्या फास्टॅग सुविधेचा लाभ घ्यावा, असं आवाहन प्राधिकरणाने केलं आहे.