संभाजीनगर – मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठीच्या पडताळणीसाठी राज्य सरकारने एक समिती स्थापन केली आहे. ही समिती बुधवारपासून मराठवाड्यातील जिल्ह्याजिल्ह्यात जावून निजामकालीन आणि त्यापूर्वीचे पुरावे तपासणार आहे.
नियुक्त केलेली शिंदे समिती बुधवारी छत्रपती संभाजी नगरमधल्या विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाली. या समितीला पुरावे म्हणून दाखवण्यासाठी चक्क भांडी आणण्यात आणली होती. या भांड्यांवर कुणबी असल्याच्या नोंदी आहेत, असा दावा करण्यात येतोय.
मराठा पंचकमिटी बेगमपुरा यांच्याकडून दोनशे ते अडीचशे वर्षांपूर्वीची तांबा-पितळीची भांडी समितीला पुरावे म्हणून दाखवण्यात येणार आहेत.
मराठा पंचकमिटी बेमगपुरा यांच्यावतीने आंदोलकांनी सांगितलं की, आमच्याकडे अत्यंत पुरातन भांडी आहेत. या भांड्यावर कुणबी, अशा नोंदी आहेत. लग्न समारंभ आणि भंडाऱ्याच्या कार्यक्रमात कुणबी समाजाकडून या भांड्यांचा वापर होई.
२०१८मध्ये आलेल्या गायकवाड समितीसमोरदेखील हीच भांडी ठेवण्यात आलेली होती. परंतु हे पुरावे ग्राह्य धरले नसल्याचं आंदोलकांनी सांगितलं. शिंदे समिती ही भांडी आणि त्यावरील वेगवेगळ्या भाषेतील नोंदी पुरावे म्हणून ग्राह्य धरणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ‘एबीपी माझा’ने हे वृत्त दिले आहे.
दरम्यान, १४ ऑक्टोबर रोजी जालन्यातल्या आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सरकारने मनोज जरांगे पाटील यांना दिलेला वेळ संपत असल्याने त्या दिवशी मेळावा होईल. राज्य सरकार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.