जळगाव – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज जळगावात ‘लखपती दीदीं’चा मेळावा पार पडला. या कार्यक्रमाला एक ते दीड लाख बचत गटाच्या महिला सहभागी झाल्या होत्या.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला सशक्तीकरणासाठी सुरु केलेल्या अनेक उपक्रमांबद्दल सांगितले. “मी सांगतो हा फक्त ट्रेलर आहे. आता आम्ही बहीण आणि मुलींच्या भूमिकेचा अजून विस्तार करणार आहोत”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
जळगावात आज (25 ऑगस्ट) ‘लखपती दीदीं’चा मेळावा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. जळगाव विमानतळ परिसरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला एक ते दीड लाख बचत गटाच्या महिला सहभागी झाल्या होत्या. तब्बल दहा वर्षानंतर नरेंद्र मोदी हे जळगाव जिल्ह्यात आले होते. यावेळी त्यांनी महिलांच्या अनेक योजनांबद्दल भाष्य केले.
“भारताच्या अर्थव्यवस्थेची एक मोठी शक्ती होत आहे. गावागावात दूर दूरच्या आदिवासी भागात बचत गटाने जे परिवर्तन होत आहे, ते सर्वांच्या समोर आहे. १० वर्षात हा आकडा मोठा आहे. १० वर्षात १० कोटी महिला या अभियानाशी जोडल्या गेल्या आहेत. आम्ही यांनाही बँकेशी जोडलं आहे. आम्ही त्यांना बँकेतून सहज आणि स्वस्त कर्ज दिलं आहे. मी तुम्हाला एक आकडा देतो. तो ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि रागही येईल. २०१४ पर्यंत २५ हजार कोटी रुपयाहून कमी बँक लोन बचत गटाला मिळालं होतं. लक्षात ठेवा. फक्त २५ हजार कोटी. पण गेल्या दहा वर्षात किमान ९ लाख कोटीची मदत देण्यात आली आहे”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
“हा फक्त ट्रेलर आहे”
“कुठे २५ हजार कोटी आणि कुठे ९ लाख कोटी. एवढंच नाही, सरकार जी थेट मदत देते, त्यातही सुमारे ३० पटीने वाढ केली. त्याचा परिणाम असा झाला की, गावातील महिलांचं उत्पन्न वाढलं आहे आणि त्या देशाला मजबूत करत आहेत. मी सांगतो हा फक्त ट्रेलर आहे. आता आम्ही बहीण आणि मुलींच्या भूमिकेचा अजून विस्तार करणार आहोत”, असेही नरेंद्र मोदींनी सांगितले.
“महिलांच्या समूहाला लाखो रुपयांचं ड्रोन देणार”
“आज सव्वा लाखाहून अधिक बँक सखी गावागावात बँकिंग सेवा देत आहे. काही महिला सांगत होत्या एक एक कोटीचा व्यवसाय करत आहेत. आम्ही महिलांच्या समूहाला लाखो रुपयांचं ड्रोन देणार आहोत. कारण ड्रोनने आधुनिक शेती करायला त्या शेतकर्यांची मदत करतील. आम्ही २ लाख पशू सखींना मदत करणार आहोत. नैसर्गिक शेतीसाठी नारी शक्तीलाच नेतृत्व देणार आहोत. त्यासाठी आम्ही कृषी सखी कार्यक्रम सुरू केला आहे. येत्या काळात लाखो कृषी सखी देशातील गावागावात तयार करणार आहोत. त्यामुळे मुलींचा विश्वास वाढेल”, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.