बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याच्या बहुचर्चित ‘जवान’ चित्रपटाचा ट्रेलर गुरुवारी रिलीज करण्यात आला. स्वत: शाहरूख खान याने सोशल मीडियावर ‘जवान’चा ट्रेलर शेअर केला. दाक्षिणात्य दिग्दर्शक एटली यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटामध्ये शाहरूखसह नयनतारा, दीपिका पदुकोण, विजय सेतुपती, प्रियामणी, सान्या मल्होत्रा, सुनील ग्रोव्हर आणि योगी बाबू यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
‘जवान’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला त्या दिवशी शाहरूख खान दुबईमध्ये होता. जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफावर हा ट्रेलर दाखवण्यात आला. यासाठी शाहरूखसह त्यांची संपूर्ण टीम येथे पोहोचली होती. यावेळी बुर्ज खलिफाच्या परिसरामध्ये शाहरूखचे हजारो चाहते जमा झाले होते. ट्रेलर प्रदर्शित होताच चाहत्यांनी जल्लोष केला. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
काय आहे कथा?
देशाला वाचवण्यासाठी सज्ज असणाऱ्या एका ‘जवान’ची ही कथा आहे. काली (विजय सेतुपती) या व्यापार्यापासून देशाला वाचवण्याची वेळ या जवानावर येते. आणि मग तो जवान अर्थात शाहरुख देशाला कसा वाचवतो हे यात पाहायला मिळणार आहे, महत्वाची बाब म्हणजे याच शाहरुख दोन वेगवेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.
7 सप्टेंबरला होणार प्रदर्शित
दरम्यान, जवान देशभरात 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहेत. पॅन इंडिया अंतर्गत हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये पाहता येणार आहे.