मृत्यूची अफवा उडवणाऱ्या पूनम पांडेविरोधात 100 कोटींचा मानहानीचा दावा करणार

बॉलीवूड अभिनेत्री- मॉडेल पूनम पांडेचा गर्भाशयाच्या कर्करोगाने मृत्यू झाल्याची बातमी पसरल्याने खळबळ उडाली होती.  याच्या अगदी दुसऱ्याच दिवशी तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून स्वत:चा व्हिडीओ शेअर करत आपण जिवंत असल्याची माहिती दिली होती. तिच्या खोटारडेपणाबद्दल आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठीच्या हीन प्रकाराबद्दल तिच्यावर टीका करण्यात आली होती. स्वत:च्या  मृत्यूची खोटी बातमी पसरवल्याने पूनम पांडे अडचणीत आली असून तिच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल करण्यात येणार आहे.

मुंबईचे रहिवासी असलेल्या फैजान अन्सारी यांनी पूनम आणि तिचा पती सॅम विरोधात कानपूर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. फैजान अन्सारी यांनी केलेल्या तक्रारीत आरोप केला आहे की, पूनम पांडे आणि तिचा पती सॅम बॉम्बे यांनी कर्करोगासारख्या गंभीर आजाराबद्दल खिल्ली उडवली आहे. पूनमने तिच्या या कृत्यामुळे कोट्यवधी नागरिकांसोबत विश्वासघात केला आहे.

पूनम पांडे कानपूरची रहिवासी असल्यामुळे फैजानने लिहिले आहे की, तो स्वत: सिव्हिल लाइन्स कानपूर कोर्टात येऊन पूनम आणि तिच्या पतिविरुद्ध 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करणार आहे. फैजानने पूनमं पांडेला तत्काळ अटक केली जावी अशी मागणी केली आहे.

पूनमच्या मृत्यूच्या खोट्या बातमीमुळे बॉलीवू़डच्या अनेक कलाकारांनी तिच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने एक निवेदन जारी करून अभिनेत्रीविरोधात गुन्हा नोंदवण्याचे आवाहन केले होते.