नवी दिल्ली – अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अंतरिम बजेट सादर केला आहे. बजेट सादर करताना सीतारमण यांनी महिलांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यावेळी त्यांनी लखपती दीदी योजनेचा उल्लेख केला.
त्यांनी सांगितलं की आतापर्यंत एक कोटी महिला लखपती झाल्या आहेत. तसेच आता तीन कोटी महिलांना लखपती बनवण्याचं त्यांनी ध्येय ठेवलं आहे.
याआधी दोन कोटी महिलांना लखपती बनवण्याचं लक्ष्य ठेवलं होतं. लखपती दीदी ही योजना नेमकी काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? लखपती दीदी कोणत्या महिलांना म्हटलं जातं हे आपण पाहूया.
लखपती दीदी योजना ही स्वंय सहाय्यता समूहातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठीचे एक पाऊल आहे. या योजनेंतर्गत सरकार महिलांना स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी १ ते ५ लाख रुपयांपर्यंत व्याजमुक्त आर्थिक मदत पुरवते. महिलांना सक्षम करणे, त्यांचा जीवनमानाचा स्तर उंचावणे, त्यांचे उत्पन्न वाढवणे असा उद्देश या योजनेचा आहे
महिलांच्या स्थितीत सुधारणा
लखपती दीदी योजनेच्या मदतीने स्वयं सहायता समूहाशी जोडल्या गेलेल्या महिला आपला उद्योग सुरु करु शकतात. देशात सध्या ८३ लाख स्वयं सहायता समूह आहेत. या समूहाशी ९ कोटींपेक्षा अधिक महिला जोडल्या गेल्या आहेत.
लखपती दीदी योजना
ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्तन्न एक लाख किंवा त्यापेक्षा थोडीशी अधिक झाली आहे त्या कुटुंबातील महिलांना लखपती दीदी म्हटलं जातं. पंतप्रधान मोदी यांची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. ७७ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन या योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेंतर्गत महिलांना एलईडी बल्ब बनवण्यापासून प्लंबिंग, ड्रोन रिपेयरिंग अशा कामांचे प्रशिक्षण दिले जाते.
सरकार योजनेंतर्गत महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देते. यासाठी महिलांची आर्थिक समज वाढावी यासाठी कार्यशाळा देखील आयोजित केले जातात. याशिवाय त्यांना छोट कर्ज, वोकेशनल ट्रेनिंग, इंटरप्रिनरशीप मदत आणि विमा कव्हरेज असे फायदा मिळतात. लखपती दीदी योजनेचा फायदा घेण्यासाठी महिलांनी कोणत्याही स्वंय सहाय्यता समूदाशी स्वत: जोडून घेणे आवश्यक असते. त्यानंतर या योजनेसाठी अर्ज करता येतो.