विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच उचलले टोकाचे पाऊल

जळगाव – शासकीय तंत्रनिकेतनच्या ग्रंथालयात विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात ग्रंथालय परिचराविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल होऊन २४ तास उलटत नाहीत, तोच तंत्रनिकेतनमधील परिचर कैलास कडधाने याने बुधवारी (ता. १) दुपारी रेल्वेसमोर स्वतःला झोकून देत आत्महत्या केली. तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या २० वर्षीय विद्यार्थिनीचा २६ ऑक्टोबरला कैलास दत्तात्रय कडधाने (वय ५३, रा. समर्थ कॉलनी, मानवसेवा विद्यालयाजवळ, पिंप्राळा, जळगाव) याने विनयभंग केल्याचा आरोप करीत पीडित विद्यार्थिनीने मंगळवारी (ता. ३१) रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

गुन्हा दाखल झाल्याने व्यथित झालेल्या कडधाने याने शिरसोली ते दापोरा या दरम्यान रेल्वे रुळावर धावणाऱ्या एक्‍स्प्रेसखाली स्वतःला झोकून देत मृत्यूला कवटाळले. रेल्वे पोलिसांना माहिती मिळाल्यावर त्यांनी तालुका पोलिस ठाण्याला कळविले.

पोलिसांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी त्यास मृतघोषित केले. सुरवातीला अनोळखी व्यक्ती म्हणून पोलिस तपास करीत होते.

मात्र, ओळख पटताच नातेवाइकांना माहिती देण्यात आली. त्या वेळी रुग्णालयात नातेवाइकांनी आक्रोश केला. मृत कडधाने याच्या मागे पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

 

jalgaonsandesh

jalgaonsandesh