वरसोली येथे पॅरासेलिंग अपघात ; दोन महिला बचावल्या

अलिबाग -दैनंदिन दिनक्रमातुन थोड निवांत राहता यावे या हेतुने पर्यटनाची संकल्पना पुढे आली. हे पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी प्रामुख्याने निसर्गाच्या सानिध्यात जाण्याचे नियोजन केले जाते. यातूनच कोकण सारख्या जैवविविधतेने समृद्ध ठीकाणी जाण्याचे बऱ्याचदा नियोजन केले जाते. याच पार्श्वभुमीवर २७ नोव्हेंबर रोजी मुंबईतील साकीनाका येथील काही पर्यटक सहकुटुंब अलिबागला फिरायला आले होते. अलिबाग तालुक्यातील वरसोली येथील समुद्रकिनारी पॅरासेलींग करताना दोर तुटून दोन महिला समुद्रात कोसळल्याची घटना घडली. यातील दोन्ही महिला बचावल्या आहेत. मात्र यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

सुजाता नारकर व सुरेखा पाणीकर या दोन महिला पहिल्यांदाच पॅरासेलींगचा अनुभव घेत होत्या. या वेळी अचानक दोर तुटल्याने त्या दोघी ही खाली पाण्यात कोसळल्या त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. बोटीवरील जीवरक्षकांनी दोघींनाही सुखरूप बाहेर काढले. ही दुर्घटना घडली तेव्हा या महिलांचे नातेवाईक त्या बोटीवर होते. या अपघातात कोणतीही जीवीत हानी झाली नसली तरी पर्यटक आणि व्यावसायिकांनी सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh