वकिलांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सूट

कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली देशात पुन्हा कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी वकिलांना वर्चुअली न्यायालयात हजर राहण्याची (work from home) परवानगी दिली आहे.

न्यायमूर्ती म्हणाले की, ‘कोरोनाची प्रकरणे वाढत असल्याचे वर्तमानपत्रातील रिपोर्ट्स दाखवतात. अशा परिस्थितीत वकिलांना वर्चुअली न्यायालयात हजर राहायचे असेल तर ते तसे करू शकतात किंवा प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहून काम करू शकतात.

आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात विक्रमी ४ हजार ४३५ जणांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. गेल्या १६३ दिवसांच्या आकडेवारीत हा उच्चांक आहे. यासह, देशातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २३ हजाराच्या वर पोहोचली आहे.

कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या २४ तासात १५ जणांचा मत्यू झाला आहे. यापैकी केरळ आणि महाराष्ट्रात प्रत्येकी चार जणांचा मृत्यू झाला. छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, पुद्दुचेरी आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी एका कोरोनाबाधित व्यक्तीने आपला जीव गमावला आहे. संसर्गामुळे आतापर्यंत एकूण ५ लाख ३० हजार ९१६ मृत्यू झाले आहेत.

गेल्या चार दिवसांत मृत्यूचे प्रमाण २०० टक्क्यांनी वाढले आहे. दरम्यान, ४० जणांना आपला जीव गमवावा लागला. १ एप्रिल रोजी पाच जणांचा मृत्यू झाला होता. २ एप्रिलला ११, तीन एप्रिलला ९ आणि ४ एप्रिलला १४ जणांचा मृत्यू झाला.