उत्तराखंडातील गुप्तकाशी येथे केदारनाथ मंदिराहून परत येणारे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाले असून, या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे. या हेलिकॉप्टरमध्ये सहा यात्रेकरू आणि एक वैमानिक होते. अपघात सकाळी 5:20 वाजता गौरीकुंड आणि सोनप्रयाग दरम्यानच्या जंगलात झाला. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर आर्यन एव्हिएशन कंपनीचे होते.
घटनेचा तपशील:
उत्तराखंड नागरी उड्डाण विकास प्राधिकरण (UCADA) ने दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये सहा यात्रेकरू – पाच प्रौढ व एक २३ महिन्यांचे बाळ आणि एक पायलट सवार होते. सर्व जण जिवंत जळाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
हेलिकॉप्टर केदारनाथ धामहून गुप्तकाशीकडे परत येत होते, त्यावेळी अचानक हवामानात बदल झाला. पायलटने हेलिकॉप्टर दरीबाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यादरम्यान अपघात झाला.
जिल्हा पर्यटन विकास अधिकारी राहुल चौबे यांनी सांगितले की, “हवामान खराब झाल्यामुळे पायलटने प्रयत्न केला, पण हेलिकॉप्टर गौरीकुंडजवळ कोसळले. एनडीआरएफ व एसडीआरएफच्या टीमने शोध व बचाव कार्य सुरू केले.”
मृतांची माहिती:
-
कॅप्टन राजबीर सिंग चौहान (वय 39, जयपूर – पायलट)
-
राजकुमार सुरेश जायसवाल, श्रद्धा जायसवाल, आणि त्यांची 23 महिन्यांची मुलगी काशी जायसवाल – यवतमाळ, महाराष्ट्र
(त्यांचा मुलगा विवान वाचला, तो आजोबांबरोबर राहिला होता.) -
विनोद देवी (वय 66) आणि तृष्टी सिंग (वय 19) – उत्तर प्रदेश
-
विक्रांत रावत – बदारिनाथ केदारनाथ मंदिर समिती (BKTC) कर्मचारी, उखीमठ, उत्तराखंड
शोध व बचाव कार्य:
स्थानिक रहिवाशांनी जंगलात अपघातग्रस्त हेलिकॉप्टर पाहिल्यावर यंत्रणेला माहिती दिली. NDRF आणि SDRF च्या टीमने सकाळी ७ वाजता गौरीकुंड गाठले आणि ८:५५ ला दुर्घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले. सर्व मृतदेह सापडले आहेत.
आग मोठ्या प्रमाणावर लागल्याने मृतदेह ओळखता येणे कठीण आहे. पोलिस महासंचालक राजीव स्वरूप यांनी सांगितले की, मृतदेह ओळखण्यासाठी डीएनए चाचणी केली जाईल.