नवी दिल्ली – महाराष्ट्राच्या राजकारणासाठी सोमवार महत्त्वाचा ठरणार आहे. राज्यातल्या राजकारणावर परिणाम करणाऱ्या घडामोडी नवी दिल्लीमध्ये घडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह देशाचं लक्ष सुप्रीम कोर्टाकडे लागलं आहे.
सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेच्या दोन मोठ्या सुनावण्या पार पडणार आहेत. शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या बद्दल सुप्रीम कोर्टात सुनावणी होईल. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे.ठाकरे गटाचे प्रतोद सुनिल प्रभू यांनी 16 आमदारांच्या अपात्रतेबद्दल पुनर्विचार याचिका दाखल केली आहे, त्यांच्या पुनर्विचार याचिकेवरही उद्याच सुनावणी होणार आहे.चंद्रचूड या देशाचे मुख्य न्यायाधीश आहेत, त्यांना आम्ही रामशास्त्री म्हणतो त्यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत, हे महाराष्ट्रातलं सरकार बेकायदेशीर आहे, असं संजय राऊत म्हणाले. तर सुप्रीम कोर्टात याची सुनावणी सुरू होणार असली तरी आमची जी न्यायाची बाजू आहे, ती आम्ही मांडू, अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली.विशेष म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी सुरू असताना आता सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय घडतं, हे पाहणं महत्त्वाचं आहे, त्यावरच महाराष्ट्रातलं भविष्यातलं राजकारण वळण घेण्याची शक्यता आहे.शिवसेनेमध्ये जून 2022 साली राजकीय भूकंप झाला, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांसह उद्धव ठाकरेंची साथ सोडली.
यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या साथीने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षावरही दावा सांगितला. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंना दिलं. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर स्थगिती द्यायला नकार दिला. तर आमदार अपात्रतेबद्दलचा निर्णय विधानसभा अध्यक्षांना घ्यायला सांगितला. तसंच विधिमंडळातला पक्ष कुणाचा हेदेखील विधानसभा अध्यक्षांनी ठरवावं, असं सुप्रीम कोर्टाने निकालात सांगितलं.