कुऱ्हा पानाचे येथे बारा गाड्या उत्साहात.

प्रतिनिधी –  जितेंद्र काटे 

भुसावळ – येथून जवळच असलेल्या कुऱ्हा पानाचे येथे दि.२७ रोजी श्री खंडेराव महाराज यात्रा व बारा गाड्या उत्साहात पार पडल्या. कुऱ्हे पानाचे सह, महादेवमाळ, मांडवेदिगर, मुशाळतांडा, भिलमळी, मोंढाळे, वराडसिम, गोजोरे, सूनसगावसह परिसरातील ग्रामस्थांनी या यात्रोत्सवात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

यात्रेच्या दिवशी खंडेराव महाराजांच्या मंदिरासह गावातील विविध मंदिरात विधिवत पूजा केली. ग्रामस्थांनी यात्रेत खरेदीचा मनमुराद आनंद घेतला. सायंकाळी परंपरेनुसार कलंकामाता मंदिरापासून बारी वाड्यापर्यंत खंडेराव महाराज की जय या जयघोषात बारागाड्या ओढण्यात आल्या. यात्रोत्सवासाठी स्थानिक गावातील विविध शहरात राहणारे नागरिक गावात आले होते. त्यामुळे यात्रोत्सवात आनंदाची भर पडली. भगत सुनील हिरालाल धनगर यांनी बारागाड्या ओढल्या. बगल्या संतोष धनगर व सुभाष पाटील यांनी जबाबदारी स्वीकारली.

या वर्षीच्या यात्रेतील प्रमुख आकर्षण म्हणजे तब्बल एक दशकानंतर या वर्षी सोपान कोळी दोनगावकर यांच्या लोकनाट्य तमाशा मंडळाचे आयोजन करण्यात आले होते.

यात्रेत पाळणे, विविध प्रकारची खेळणी, खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने थाटली होती. यात्रेत होणारी गर्दी पहाता कुठेही अनुचित प्रकार घडू नये. तसेच बारागाड्या ओढणे निर्विघ्न पार पडावे. यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त केला. यात्रा उत्सव व्यवस्थित पार पाडण्यासाठी सरपंच, उपसरपंच, समस्त ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, पोलीस प्रशासन, समस्त गावकऱ्यांनी सहकार्य केले. यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी भुसावळ तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.