‘टॉवर चौक’ वाहतूक सुरक्षा मॉडेल; नियम मोडल्यास कॅमेऱ्याद्वारे दंड

जळगाव – शहरातील वाहतुकीला शिस्त नसल्यामुळे अनेक चौकात खोळंबा होत असतो. त्यामुळे महापालिकेने शहरातील चौक सुधारणेचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत महत्त्वाचे आणि वर्दळीचे असलेले टॉवर चौक आता वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने मॉडेल चौक करण्यात येणार असून त्या दृष्टीने काम सुरू करण्यात आले आहे.

शहरात महत्त्वाचा आणि मध्यवर्ती भागात असलेल्या टॉवर चौकात वाहतुकीचा खोळंबा होत आहे. शिवाजीनगरचा पूल आता थेट या चौकाजवळ उतरत असल्यामुळे वाहतूक वाढली आहे. तसेच याच ठिकाणी ग्रामीण भागात जाण्यासाठी लोकांना बसथांबा असल्याने त्या ठिकाणी आता कालीपीली गाड्यांचा थांबाही झाला आहे.

तसेच याच ठिकाणाहून जिल्हा परिषद व श्‍यामाप्रसाद मुखर्जी उद्यानाकडे जाणारा मार्गही आहे. पुलावरून उतरल्यावर थेट वाहनधारक या ठिकणाहून वळण घेत असतात. त्यामुळे या ठिकाणी किरकोळ अपघात होत आहेत. आजच्या स्थितीत या चौकात सर्वच वाहतूक बेशिस्त झाल्याने हा चौक सुरक्षित वाहतूक मॉडेल चौक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वाहतूक दिवे उंचावर बसविणार

चौकात बसविण्यात आलेले वाहतूक दिवे अत्यंत खालच्या ठिकाणी असल्याने ते दुरून येणाऱ्या वाहनधारकांना दिसत नाही, त्यामुळे ते आता नवीन पद्धतीने उंचावर बसविण्यात येणार आहे. त्यामुळे दुरूनही वाहनधारकांना दिसणार आहे.

कॅमेरेबसविणार

याच वाहतूक दिव्यावर कॅमरेही बसविण्यात येणार आहेत. त्यातून बेशिस्त वाहनधाकांवर नजर ठेवण्यात येणार आहे. जे वाहनधारक नियम मोडतील त्यांना थेट ऑनलाइन पद्धतीने दंडाची आकारणी होणार आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांशी कोणताही वाद होणार नाही.

जिल्हा परिषद, श्‍यामाप्रसाद उद्यान एकेरी मार्ग

शिवाजीनगर पुलाजवळून एक मार्ग श्‍यामाप्रसाद मुखर्जी उद्यानाकडे जातो तर दुसरा मार्ग जिल्हा परिषदेकडे जातो, परंतु दोन्ही आजच्या स्थितीत दोन्ही मार्गावर जाणाऱ्या येणाऱ्यांची वाहतूक सुरू असते. परंतु आता दोन्ही मार्ग एकेरी वाहतूक करण्यात येणार आहे. एक मार्ग जिल्हा परिषदेकडे टॉवर चौकात येणारा असले तर एक मार्ग मार्ग टॉवर चौकाकडून श्‍यामाप्रसाद मुखर्जी उद्यानाकडे जाणारा असेल.

या मार्गावर वाहतूक धारकांना पुलावरून उतरल्यावर थेट श्‍यामाप्रसाद मुखर्जी उद्यानाकडे वळता येणार नाही किंवा जिल्हा परिषदेकडून आलेला वाहनधारक थेट शिवाजीनगर पुलावर जाणार नाही. त्यांना टॉवर चौकात वळसा घालून मग जावे लागणार आहे. त्यामुळे कोणतीही वाहतूक कोंडी होणार नाही.

बसथांबा जुन्या बसस्थानकात

ग्रामीण भागात जाणाऱ्या नागरिकांसाठी पुलाखाली बसस्टॉप आहे, त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. आता हा बसस्टॉप जुन्या बसस्थानकात हलविण्यात येणार आहे. या ठिकाणी उभे राहत असलेल्या कालीपीली वाल्यांनाही नवीन ठिकाणी हलविण्यात येणार आहे. हा चौक वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने पूर्णपणे मोकळा करण्याची कार्यवाही महापालिकेतर्फे सुरू करण्यात येत आहे.

चौकांचे डांबरीकरण

टॉवर चौकाकडून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत आहे. त्याचे कामही आता सुरू झाले आहे. रस्त्याच्या साईडपट्ट्याचे डांबरीकरण आता सुरू करण्यात आले आहे. ते पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी असलेले तात्पुरते वाहतूक दुभाजक काढून ते पक्के टाकण्यात येणार आहे. तसेच चौकात झेब्रा क्रॉसिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे या चौकात वाहतूक सुरक्षा होईलच तसेच चौकाचा संपूर्ण लुक बदलणार आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh