शाळेत उठाबशा काढायला लावल्याने चिमुरड्याचा मृत्यू; इयत्ता चौथीचा विद्यार्थी क्लासच्या वेळेत बाहेर खेळल्याने शिक्षकाने केली शिक्षा

पुरी – ओडिशातील जाजपूर जिल्ह्यात एका सरकारी शाळेतील चौथीच्या विद्यार्थ्याचा उठाबशा काढताना मृत्यू झाला. हा मुलगा बाहेर इतर मुलांसोबत खेळत होता. यामुळे संतापलेल्या शिक्षकाने मुलाला उठाबशा काढण्याची शिक्षा केली.

काही वेळाने मुलगा जमिनीवर पडला. रुग्णालयात नेले असता तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले.

खेळताना शिक्षकाने फटकारले, मग शिक्षा

हे संपूर्ण प्रकरण ओरली येथील सूर्य नारायण नोडल उच्च प्राथमिक शाळेशी संबंधित आहे. रुद्र नारायण असे या विद्यार्थ्याचे नाव होते. 10 वर्षांचा रुद्र हा चौथीच्या वर्गात शिकत होता. 21 नोव्हेंबर रोजी दुपारी 3च्या सुमारास वर्गाची वेळ होती. मात्र, रुद्र कॅम्पसमध्येच इतर मुलांसोबत खेळत होता. रुद्रला पाहिल्यावर शिक्षकाला खूप राग आला. त्याने रुद्रला फक्त खडसावले नाही तर उठाबशा काढण्याची शिक्षाही दिली. काही वेळाने मुलगा जमिनीवर पडला.

मुलाच्या बेशुद्धीची माहिती त्याच्या पालकांना देण्यात आली, जे रसूलपूर ब्लॉकजवळील ओरली गावचे रहिवासी आहेत. दरम्यान, शिक्षक मुलाला घेऊन कम्युनिटी सेंटरमध्ये गेले. तेथून त्याला कटकच्या मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले.

मुलाच्या वडिलांनी तक्रार केली नाही

या संपूर्ण प्रकरणावर रसूलपूरचे गटशिक्षण अधिकारी निलांबर मिश्रा म्हणाले की, त्यांच्याकडे अद्याप कोणतीही औपचारिक तक्रार आलेली नाही. “आम्हाला औपचारिक तक्रार मिळाल्यास, आम्ही तपास सुरू करू आणि जो कोणी दोषी असेल त्याच्याविरुद्ध आवश्यक कारवाई करू,” असेही ते म्हणाले. दुसरीकडे, मुलाच्या वडिलांनी पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. मात्र, रसूलपूरचे सहायक गटशिक्षणाधिकारी प्रवंजन पाटी यांनी शाळेला भेट देऊन घटनेची चौकशी सुरू केली आहे.