राज्यातील अनेक पेट्रोल पंपांवर इंधनाचा ठणठणाट; सकाळपासूनच ‘नो स्टॉक’चे बोर्ड, वाहनचालक धास्तावले

केंद्र सरकारने हिट अँड रन कायद्यात बदल केल्यानंतर देशभरातील ट्रकचालक आक्रमक झाले आहेत. नव्या वाहन कायद्याला विरोध म्हणून देशभरातील वाहनचालकांनी तीन दिवसांसाठी संप पुकारला आहे.

परिणामी अनेक ठिकाणी अवजड वाहने रस्त्यावरच उभी आहेत.

त्यामुळे पेट्रोल-डिझेल-गॅस या इंधनासह जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा ठप्प झाला. फळे, भाजीपाला, दूध, शेतीमाल यासारख्या वस्तूंच्या वाहतुकीवर परिणाम होत आहे.

इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरचालकांनी संप पुकारल्याची बातमी कळताच राज्यातील अनेक पेट्रोलपंपावर वाहनचालकांनी सोमवारी रात्री मोठी गर्दी केली होती. काही पंपांवर ३ किमीपर्यंत रांगा लागल्या होत्या.

पेट्रोल मिळेल की नाही या धास्तीने अनेकांनी वाहनांच्या टाक्या फुल करून घेतल्या. परिणामी राज्यातील अनेक जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा निर्माण झाला असून सकाळपासूनच पंपावर ‘नो स्टॉक’चे बोर्ड लागले आहेत.

छत्रपती संभाजीनगर शहरातील पेट्रोल पंपापर सकाळपासून नो स्टॉकचे बोर्ड लागले आहेत. सिडको भागातल्या सगळ्या पेट्रोल पंपावर आज सकाळपासूनच नो स्टॉकचे बोर्ड लागल्यामुळे ज्यांच्याकडे पेट्रोल- डिझेल नाही त्यांची आज अडचण होईल असं दिसतंय.

दुसरीकडे आज सकाळपासून अनेक वाहनधारक पेट्रोल घेण्यासाठी पेट्रोल पंपावर थांबून आहेत. एपीआय कॉर्नर इथल्या एका पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळत असल्यामुळे वाहनधारकांनी तिकडे गर्दी केली होती. सकाळी सकाळी या पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल मिळवण्यासाठी अक्षरश: झुंबड उडाली आहे.

दरम्यान, इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरचालकांनी संप पुकारल्यामुळे नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, अकोला, धाराशिव, बीड, लातूर, हिंगोली या जिल्ह्यांना पानेवाडीतून इंधन पुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे इंधनटंचाईचं संकट निर्माण झालं आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh