घरच्या अभ्यासाला कायमची सुट्टी? मुलांचा अभ्यास करुन घेण्याचं पालकांचं मोठं टेन्शन लवकरच संपणार

महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी विद्यार्थ्यांच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाचे मत मांडले आहे. विद्यार्थ्यांना गृहपाठ न देता त्यांचा अभ्यास शाळेतच करुन घ्यावा असे मत राज्यपाल रमेश बैस यांनी मांडले आहे.

याआधी राज्यपाल बैस यांनी शाळांच्या वेळांबाबत भाष्य केलं होतं. त्यानंतर पहिली ते चौथीच्या शाळांची वेळ सरकारने बदलली होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यपालांनी व्यक्त केलेल्या मताबाबत सरकार विचार काय पाऊल उचलणार याकडे सर्वाचे लक्ष लागलं आहे.

दोन वर्षांपूर्वीदेखील राज्याच्या शालेय शिक्षण मंत्र्यांनी पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याचे सूतोवाच केले होते. याबाबत शिक्षणतज्ज्ञांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याचे मंत्र्यांनी सांगितले होते. मात्र त्याबाबत पुढे काही ठोस निर्णय झाला नाही. त्यानंतर आता राज्यपाल बैस यांनी गृहपाठ न देण्याबाबत मत व्यक्त केल्यानंतर शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञांच्या भुवया उंचावल्या आहेत.

काय म्हणाले राज्यपाल बैस?

वेध प्रोफेशनल लर्निंग कम्युनिटी यांच्यातर्फे लोणावळा येथे आयोजित केलेल्या शिक्षक संमेलनाच्या कार्यक्रमात राज्यपाल बैस बोलत होते. जगातील अनेक राष्ट्रात विद्यार्थ्यांना गृहपाठ दिला जात नाही, आपणही हे धोरण स्विकारण्याची गरज आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गृहपाठ देण्याऐवजी शाळेतच अभ्यास करून घ्यावा, असे मत राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केले. क्षेत्र भेट, ऐतिहासिक स्थळे, गडकिल्ले, नदी, वारसा स्थळ, उद्यान भेट असे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण प्रगतीस हातभार लावावा, असेही आवाहनही त्यांनी केले.

“समूहामध्ये विद्यार्थ्याच्या विचारशक्तीचा विस्तार होतो, त्यांच्यात एकत्रितपणे पुढे जाण्याची भावना निर्माण होते. खेळामुळे विजय आणि पराभव सहजतेने पचवण्याची क्षमता निर्माण होते. मुलांना मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, नव्या गोष्टींबाबत विषयी उत्सुकता निर्माण होण्याच्या दृष्टीने प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहित करावे लागेल. यासोबत शिक्षकांनी आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा बारकाईने अभ्यास करण्याची गरज आहे. देशाच्या आत्मनिर्भरतेसाठी विद्यार्थी सक्षम होणे गरजेचे आहे. 21 व्या शतकात आवश्यक कौशल्य त्यांने संपादन करावे म्हणून वर्गाच्या आत आणि बाहेरच्या शैक्षणिक प्रक्रियेत बदल करावे लागतील. शिक्षणात तंत्रज्ञानाच्या समावेशाने विद्यार्थ्यांचे ज्ञान अद्ययावत करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करावा. कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग वैयक्तिक अध्ययनासाठी करणे शक्य आहे,” असेही राज्यपाल बैस म्हणाले.

jalgaonsandesh

jalgaonsandesh