ही चकाचक दिसणारी इमारत कॉर्पोरेट ऑफिस नसून तुरखेडा ग्रामपंचायत कार्यालय आहे.

जळगाव -भारताचा आत्मा खेड्यात आहे असं म्हणतात. ग्रामीण विकास या विषयावर मोठमोठ्या चर्चा होत असतात. लाखो करोडो रुपयांचे पॅकेज, कित्येक योजना दरवर्षी ग्रामीण विकासासाठी जाहीर केल्या जातात. पण आजही भारतातील जास्तीत जास्त गावे मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.

वरच्या पातळीवर एवढं भरघोस काम होऊनही ते तळापर्यंत का पोचत नाही? गावे अविकसित का राहतात? याचं कारण आहे स्थानिक राजकारण्यांच्या, पुढाऱ्यांच्या इच्छाशक्तीचा अभाव!

जळगाव पासून अवघ्या काही किलोमीटरवर असलेले तुरखेडा हे गाव लागतं. सातत्याने राबवलेलं स्वच्छता अभियान आणि गावामध्ये झाडांनी केलेली सजावट यामुळे गावाचं रुपडं उठून दिसतं.

या गावात नुकतीच झालेली आणखी एक मोठी गोष्ट म्हणजे नवीन ग्रामपंचायत इमारत. हे ग्रामपंचायत कार्यालय अवघ्या तेराशे स्क्वेअर फुटामध्ये बांधण्यात आलेली आहे.

ग्रामपंचायत कार्यालय बांधकामासाठी सरपंच मंगला पंढरीनाथ सपकाळे व सदस्य यांनी परिश्रम घेतले.

कार्यालय आतमधुन एखाद्या कॉर्पोरेट कंपनीच्या ऑफिसप्रमाणे या नव्या इमारतीची निर्मिती करण्यात आली आहे. संगणकीकृत प्रणाली आणि अद्ययावत सुविधांनी युक्त होणार असलेली ही इमारत गावकऱ्यांना सर्व सुविधा देण्यासाठी तत्पर असणार आहे.

ही अत्याधुनिक इमारत बांधताना पर्यावरणाचा काळजीपूर्वक विचार करण्यात आला आहे.

परिसरात शोभेची झाडे लावणार असल्याने इमारत आणखी उठून दिसणार आहे. सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

या कार्यालयासाठी जन सुविधा अंतर्गत अंदाजे २२ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

येत्या काळात गावकऱ्यांना तत्पर सुविधा देण्यासाठी हे ग्रामपंचायत कार्यालय सज्ज असणार आहे.

ताजा खबरें