मध्य प्रदेशातील उपजिल्हाधिकाऱ्यांचा राजीनामा मंजूर, घरच्या कार्यक्रमासाठी सुट्टी न दिल्याने दिला होता राजीनामा

मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी निशा बांगरे यांचा राजीनामा मध्य प्रदेश सरकारने स्वीकारला आहे. एका सरकारी आदेशात म्हटले आहे की, राज्य सरकारने छतरपूर जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी निशा बांगरे यांचा शासकीय सेवेतून राजीनामा स्वीकारला आहे. बांगरे यांनी राजीनामा देताना म्हटले होते की, “मला माझ्याच गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू न देण्याच्या प्रशासनाच्या निर्णयामुळे मी खूप दुखावले आहे. गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाच्यावेळी मला मंदिरात जाऊन दर्शनही घेता आले नाही, ज्यामुळे माझ्या धार्मिक भावनाही दुखावल्या गेल्या आहेत. माझे मुलभूत हक्क, धार्मिक श्रद्धा आणि संवैधानिक मूल्यांशी तडजोड करून सेवा चालू ठेवणे मला योग्य वाटत नाही. त्यामुळे 22 जून रोजी मी उपजिल्हाधिकारी पदाचा तात्काळ राजीनामा देत आहे.”

निशा बांगरे यांनी आपला राजीनामा तत्काळ स्वीकारला जावा यासाठी आमला, बैतुल ते मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान अशी ‘नय पद यात्रा’ काढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पोलिसांनी याला परवानगी नाकारली होती. तरीही बांगरे यांनी ही यात्रा काढली. ही यात्रा 9 ऑक्टोबर रोजी भोपाळला पोहोचली होती. परवानगी नसल्याने त्यांची यात्रा पोलिसांनी भोपाळमध्येच अडवली होती. सरकारी सेवेचा राजीनामा देणाऱ्या निशा बांगरे या निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा पूर्वीपासून सुरू होत्या. त्या बैतुल जिल्ह्यातील आमला मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. मध्य प्रदेशात 17 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. मतदानानंतर 230 विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून को निवडून येतो हे स्पष्ट होईल.

ताजा खबरें