शिक्षकेतर कर्मचारी आंदोलनावर ठाम, बारावीच्या परीक्षांना झळ बसणार

महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 2 फेब्रुवारीपासून परीक्षा कामकाजावर बहिष्कार टाकला असून या आंदोलनाचा फटका सध्या सुरू असलेल्या बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांना बसत आहे.

आता या संपाचे सावट बारावीच्या लेखी परीक्षांवरदेखील घोंघावत आहे. राज्य सरकारने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास 20 फेब्रुवारीपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय संपात सहभागी झालेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी घेतला आहे. हे आंदोलन पुढे सुरूच राहिल्यास 21 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या बारावीच्या लेखी परीक्षांना या संपाची झळ बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा रद्द केलेला शासन निर्णय पुन्हा लागू करण्यात यावा या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 2 फेब्रुवारीपासून विद्यापीठांतर्गत येणाऱ्या परीक्षांवर बहिष्कार टाकला आहे. या बहिष्कार आंदोलनाचा फटका पदवी महाविद्यालयांशी संलग्नित कनिष्ठ महाविद्यालयांनादेखील बसला असून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांअभावी बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात महाविद्यालयांना अडचणी येत आहेत. मुंबईतील रुईया, भवन्स चौपाटी, साठय़े, बीएनएन कॉलेज भिवंडी आदी महाविद्यालयांनी प्रात्यक्षिक परीक्षेच्या आयोजनात येणाऱ्या अडचणींविषयी मुंबई विभागीय शिक्षण मंडळाला पत्र पाठविले आहे.

14 फेब्रुवारीला लंच टाईममध्ये निदर्शने, 15 फेब्रुवारीला काळ्या फिती बांधून निषेध, 16 फेब्रुवारीला एकदिवसीय लाक्षणिक संप आणि 20 फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याचे अशासकीय महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघाचे सरचिटणीस माधव राऊळ यांनी सांगितले.

प्रात्यक्षिक परीक्षांमध्ये येणाऱ्या अडचणींबाबत महाविद्यालयांचे बोर्डाला पत्र

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांअभावी मुंबईतील अनेक महाविद्यालयांना बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात अडचणी येत आहेत. कर्मचाऱ्यांअभावी परीक्षा घेणे कठीण असल्याचे अनेक प्राचार्यांचे म्हणणे आहे. या संपावर लवकरात लवकर तोडगा काढावा तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांअभावी परीक्षा कशा घ्याव्यात याविषयी मार्गदर्शन करण्याची विनंती प्राचार्यांनी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुंबई विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिवांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.

काही महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात अडचणी होत असल्याचे पत्र पाठविले आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य आवश्यक आहे. अद्याप कोणत्याही महाविद्यालयाकडून प्रात्यक्षिक परीक्षा बंद असल्याचे कळविण्यात आलेले नाही.