संपूर्ण सृष्टी या काळाची विद्यार्थी आहे.शिक्षकदिन विशेष, पो.ना. मृत्यूकार विनोद अहिरे….

JALGAON-५सप्टेंबर आपल्या देशामध्ये राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो आज देखील संपूर्ण भारतभरा मध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक दिन मोठ्या प्रमाणात साजरा होत नव्हता.

तसे बघायला गेले तर या जगामध्ये प्रत्येक माणूस शिक्षक आणि विद्यार्थीच आहे. तो जीवन जगत असताना कोणाला तरी शिकवत असतो आणि कोणाकडून तरी काहीना काही शिकत असतो.

परंतु यामध्ये सर्वात मोठा शिक्षक जर कोणी असेल तर तो “काळ” आहे. मला असं वाटतं की, जेव्हापासून या सृष्टीची निर्मिती झाली या मानवजातीला त्याने काळानुरूप शिक्षणातून काहीना काही शिकविले आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर काळाने भगवान गौतम बुद्धांना वेदनेने विव्हळत पडलेला रोगी दाखविला त्याचबरोबर रोहिणी नदीच्या पाण्यावरून कोलीय आणि शांक्य यांच्यामध्ये पडलेली युद्धाची ठिणगी यातून राजवैभव सोडून भगवंताने दुःखाचे मूळ शोधण्यासाठी अलंकार, राज वस्त्रांचा त्याग करून काशाय वस्त्रे परिधान करून युवराज सिद्धार्थचा भगवान गौतम बुद्ध होऊन संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देऊन दुःखाचे मूळ कारण म्हणजे मोह माया मत्सर हे असून, त्याकरिता जग जिंकण्याच्या अगोदर आपल्या मनाला जिंका आणि त्यानंतर जग जिंकण्याचे स्वप्न पहा हा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध जगाला लाभलेली सर्वात मोठी देणगी आहे.म्हणून आपण आभार मानले पाहिजे त्या काळाचे ज्याने आपल्याला भगवान गौतम बुद्ध दिले.

राष्ट्रमाता जिजाऊंना काळाने रयतेच्या वेदना दाखवल्या नसत्या तर छत्रपती शिवाजी महाराज घडलेच नसते. आणि शिवबांची भवानी तलवारही तडपली नसती. साऱ्या जगाला हेवा वाटावा अशी युद्धनीतीही कळली नसती, म्हणून आपण त्या काळाचे आभार मानू त्याने आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज दिले.

जोतिबांचा लग्नात अपमान झाला नसता तर त्यांनी सावित्रीमाईला सोबत घेऊन शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली नसती तर या देशाला इंद्रागांधी, प्रतिभाताई पाटील या सारख्या प्रथम महिला पंतप्रधान, राष्ट्रपती लाभल्या नसत्या म्हणून आपण त्या काळाचे आभार मानले पाहिजे. ज्याने आपल्याला ज्योतिबा सारखे महात्मा आणि सावित्रीमाई सारखी विद्येची देवता दिली.

डॉक्टर बाबासाहेबांना लहानपणापासून अस्पृश्यतेचे चटके काळाने दाखवले नसते तर अमेरिकेच्या विद्यापीठाने कोणाला सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हटलं असते. संपूर्ण जगाला हेवा वाटावा असे संविधान आपल्याला मिळालेच नसते. या काळानेच आपल्या शिक्षणातून या सारखे असंख्य महापुरुष घडवले आणि त्यांनी या जगाला दिशा देण्याचे काम केले आहे. म्हणूनच माझ्यामते काळ हा सर्वात मोठा शिक्षक आहे.

अशाप्रमाणे संपूर्ण सृष्टी या काळाची विद्यार्थी आहे.

सध्याची परिस्थिती लक्षात घेता काळाने याअगोदर वेळोवेळी मानवाला दिलेली शिकवण मानवाने अंगिकारली नाही, म्हणूनच आपल्याला आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळाने दिलेली शिक्षाच आहे.

हवा तर इतिहास चाळुन बघा जेव्हा जेव्हा काळाने, निसर्गाने मानवाला दिलेले इशारे समजून न घेता मानवाने आपल्या राक्षसी महत्त्वाकांक्षेला महत्त्व दिलेले आहे, त्याचे परिणाम मानव जातीला भोगावी लागली आहे. काळाचे शिक्षण देण्याचे एक खास विशिष्ट आहे. तो एकदा शिकविल्यानंतर ते पुन्हा कधीच शिकवत नाही. जर आपण हुशार विद्यार्थी सारखे त्यांने दिलेले शिकवलेले ज्ञान उत्तमरीत्या ग्रहण करून आपल्या आचरणात आणले तर आपले कल्याणच होणार! नाही तर विनाश हा अटळ आहे….!                                                          शिक्षक दिनाच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा

पो.ना. विनोद पितांबर अहिरे नेम. पोलीस मुख्यालय जळगाव 9823136399                                  महाराष्ट्र पोलीस दलातील साहित्यिक, कवी, समीक्षक आहेत.

ताजा खबरें