दुचाकी घसरून महिलेचा मृत्यू! लहान बहीण-भावाचे मातृछत्र हरपले

जळगाव – डांभुर्णी (ता. यावल) येथून केळीचे घड घेऊन शेतात मजुरीसाठी जात असलेल्या शेतमजुर महिलेचा दुचाकी घसरुन मृत्यू झाला. कोळन्हावी गावाजवळ सोमवारी (ता. १५) अपघात झाला होता.

डोक्याला गंभीर दुखापझ झाल्याने महिलेला जिल्‍हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचारापूर्वीच तुळसाबाई रमेश भील (वय २५, रा. विष्णापूर, ता. चोपडा) यांचा मृत्यू झाला.

डोळ्यादेखत आईचा मृत्यू झाल्याने चिमुरडे अश्रू ढाळत होती. जिल्‍हा सामान्य रुग्णालय तथा शासकिय वैद्यकीय महाविद्यालय आवारात शवविच्छेदन गृहाबाहेर आईची, चप्पल, पाण्याची बॉटल आणि कपडे घेऊन रडत बसलेल्या चिमुरडीला कदाचित मरण काय असते, तेही माहिती नसावे. डोळ्यादेखत अपघात होऊन चालती-बोलती आई अचानक शांत झाली.

इतके लोक तिला दवाखान्यात घेऊन आले, आई का बोलत नाहीये, म्हणून तिला हाका मारून घशाला कोरड पडली अन्‌ निरागस चेहऱ्याने आईच्या मृतदेहाकडे बघणारी लेकरे पाहून अनेकांच्या डोळ्यातून अश्रू तरळले. विष्णापूर (ता. चोपडा) येथे तुळसाबाई रमेश भिल (वय २५) वास्तव्यास होती. शेतात मजुरी करणाऱ्या आईवडिलांबरोबर दोन्ही लेकरे शेतात जात होते.

सोमवारी डांभुर्णी येथून तुळसाबाई, पती रमेश आणि चार वर्षांची मुलगी गायत्री शेतात मजुरीसाठी दुचाकीने निघाले होते. कोळन्हावी गावाजवळ दुचाकी घसरल्याने तुळसाबाई रस्त्यावर पडल्या. डोक्याला जबर इजा पोचल्याने बेशुद्धावस्थेत तुळसाबाई यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले.

तेथे डॉक्टरांनी तपासून तुळसाबाई यांना मृत घोषित केले. डोळ्यासमोरच अपघातात पत्नी गेल्यामुळे पतीने आक्रोश केला, तर चिमुकली निरागस नजरेने मातेच्या मृतदेहाकडे पाहत असल्याने तिला काय झाले, हे समजण्याइतपत जाणीव नसल्याने तिच्याकडे पाहून अनेकांचे डोळे पाणावले.