दक्षिणात्य अभिनेते रजनीकांत यांचा चित्रपट म्हणजे दक्षिणेकडे एखादा उत्सवच असतो. फर्स्ट डे, फर्स्ट शोसाठी अक्षरशः उडय़ा पडतात. येत्या 10 ऑगस्ट रोजी रजनीकांत यांचा ‘जेलर’ हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार असून या चित्रपटासाठी शहरातील कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱयांना सुट्टी जाहीर करून टाकली आहे.
या चित्रपटातील ‘नुवू कावलया’ हे गाणे तमन्ना भाटियाच्या अदाकारीमुळे आणि नृत्यामुळे गाजत आहे. रजनीकांत हे 2 वर्षांनंतर पुन्हा रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. वयाच्या सत्तरीतही रजनीकांत यांची लोकप्रियता प्रचंड असून त्यांचा चित्रपटातील वावर, स्टाईल आणि संवादफेक यांवर रसिक प्रेक्षक चित्रपटगृह अक्षरशः डोक्यावर घेतात. त्यांच्या भव्य कटआऊटला दुग्धाभिषेकही केला जातो. दरम्यान, जेलर चित्रपटात रजनीकांत हे पोलीस अधिकाऱयाच्या भूमिकेत आहेत.