16 आमदार अपात्रतेबाबत ठाकरे गटाची याचिका

मुंबई – शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. लवकरात लवकर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घ्यायला सांगा या आशयाची याचिका सुनील प्रभूंकडून दाखल करण्यात येत आहे.

सुनील प्रभूंच्या या याचिकेवर आता सर्वोच्च न्यायालयाची भूमिका काय असणार? न्यायालय आता महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना काही निर्देश देणार का? हे पाहणे महत्त्वपूर्ण आहे. आमदार अपात्रतेबाबतचा हा निर्णय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होता. ११ मे रोजी याबाबत निकाल देत, न्यायालयाने याबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असा निर्णय दिलेला आहे.

विधानसभा अध्यक्षांकडे याबाबतचा सर्व अधिकार दिलेले असताना, अध्यक्षांकडून याबाबत काही हालचाल नाही. कोणतीही कार्यवाही केली गेली नाही. हा निर्णय आणखी लांबणीवर जाऊ शकतो. आज महाराष्ट्रात राजकीय परिस्थिती पाहता, अपात्रतेच्या मुद्द्यावर अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा. अध्यक्षांना तशा पद्धतीचे निर्देश देण्यात यावेत, अशा आशयाची याचिका शिवसेना ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आली आहे.

काय आहे 16 आमदारांची अपात्रतेची याचिका –

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, सुनील प्रभू यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निवडीला आव्हान दिले आहे. बंडखोर आमदारांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापनेची परवानगी देण्याचा राज्यपालांचा निर्णय यावर शिवसेनेने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

शिंदे सरकारने विधिमंडळात सादर केलेला बहुमताचा प्रस्ताव व त्याच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला शिवसेनेने आव्हान दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांची विधिमंडळ गटनेतेपदी केलेली निवड पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रद्द केली होती. या निर्णयाला शिंदे गटाने आव्हान दिले आहे.

शिवसेनेच्या मुख्य प्रतोद पदी सुनील प्रभू यांची नियुक्ती उद्धव ठाकरेंनी केली होती. त्यालाही शिंदे गटाने आव्हान दिले आहे.विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिंदे गटातील आमदारांना दिलेल्या अपात्रतेच्या नोटिसांना आव्हान देण्यात आले आहे.

या 16 आमदारांविरोधात याचिका –

1 ) एकनाथ शिंदे

2) अब्दुल सत्तार

3) संदीपान भुमरे

4) प्रकाश सुर्वे

5) तानाजी सावंत

6) महेश शिंदे

7) अनिल बाबर

8) यामिनी जाधव

9) संजय शिरसाट

10) भरत गोगावले

11) बालाजी किणीकर

12) लता सोनावणे

13) सदा सरवणकर

14) प्रकाश आबिटकर

15) संजय रायमूलकर

16) रमेश बोरनारे